शासन आपल्या दारी :
मनरेगाचा आधार ; मजुरांना नियमित रोजगार
चंद्रपुर :- दि.२७: मनरेगा कामांची नियोजनपूर्वक आखणी करून प्रभावी अंमलबजावणी केल्याने यावर्षी चंद्रपुर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील मजुरांनी हजेरी लावली आहे. मजुर उपस्थितीमध्ये चंद्रपुर जिल्हा आज राज्यात द्वितीय स्थानांवर तर ग्रामपंचायत अंतर्गत कामाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातंर्गत सर्व तालुक्यामधील नरेगाच्या विविध कामावर आज रोजी ७१ हजार ६४३ एवढे मजुर काम करीत आहे.
शेतीमधील कामे संपल्यावर शेत मजुरांकडे कोणतीही कामे उपलब्ध राहत नाही. अशा वेळी त्यांना रिकामे राहावे लागते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येते. अशा बिकट प्रसंगी ग्रामीण मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चंद्रपुर जिल्ह्यात महत्तवाची भुमिका बजावत असून ग्रामीणांच्या उदरनिर्वाहास हातभार लावत आहे.
मनरेगा अंतर्गत वैयक्तीक व सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारची कामे हाती घेतल्या जाते, यामध्ये भूमिहीन शेतमजुर व अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर, शेततळे, मजगी, फळभाग, शेतबांध बंदीस्ती, बोळी खोलीकरण, नॉडेप, शौषखड्डे, गुरांचे गोठे, बॉयोगॉस, शेळी निवारा, कुकुटपालन शेड अशी विविध वैयक्तीक स्वरुपाची कामे व तसेच सार्वजनिक भौतिक सुविधांची मालमत्ता निर्माण करणारी कामे जसे गोडावुन, ग्रामपंचायत भवन, ग्रामसंघ भवन, शेत पांदन रस्ते, तलावतील गाळ काढणे, वृक्ष लागवड अशी अनेक कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घेतली जातात. याकरिता ग्रामपंचायती अंतर्गत सर्व कामाचे नियोजन अर्थिक वर्ष सुरु व्हायच्या आधीच करण्यात येते. सदर वार्षीक नियोजन आराखडा सर्वव्यापक व सर्वंकश बनविण्यावर जिल्हा परिषद चंद्रपुर प्रशासनांकडुन विशेष प्रयत्न केल्या जात आहे.
जास्तीत-जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे तसेच जिल्ह्यात नविन्यपुर्ण कामे करण्यावर जिल्हा परिषदेने भर दिला आहे. यावर्षी ग्रामीण भागात खेळ प्रवृत्तीचा विकास करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील युवकांना सैनिक भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागात क्रिडांगण उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी प्रती तालुका पाच क्रिडांगणाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देवुन एकूण ७५ कामे जिल्हयात एकाच वेळी मनरेगामधुन सुरु केली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात एक गोडावुन व ग्रामसंघ भवन तयार करण्याचे नियोजन केले आहे.
जिल्ह्याला मागील वर्षी केंद्रशासनाने ३५.२३ लक्ष मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट दिले असतांना जिल्ह्याने ४९.६१ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती केली होती. चालु वर्षाकरिता केंद्राने ३७.५८ लक्ष मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट दिले असतांना जिल्हा परिषदेतर्फे ५० लक्ष मनुष्यदिवस निर्मितीचा प्रयत्न आहे. एकंदरीत मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी हजर राहून प्रभावी उपाययोजना राबवित असल्याचे दिसून येते.
जिल्हयात सर्व तालुक्यात मनरेगा योजनेतुन नाविण्यपुर्ण कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा)कपिल कलोडे यांनी दिली आहे. |
चंद्रपुर जिल्हयांतुन मोठ्या प्रमाणात मजुरीसाठी होणारे स्थलांतरण मनरेगा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कमी करणे शक्य झाले असून क्रिडांगण, गोडावुन इत्यांदीसारख्या मत्ता ग्रामीण भागात या योजनेमुळे उभ्या राहत असल्याच्या भावना विवेक जॉनसन यांनी व्यक्त केल्या आहेत. |
मजुरांना कठीण काळातही नियमित रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगाअंतर्गत जास्तीत जास्त कामे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या आहेत.
|
-- जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर..
00000
No comments:
Post a Comment