Search This Blog

Friday, 26 May 2023

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण व्हावी


पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण व्हावी

पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे मनपा आयुक्तांना निर्देश

चंद्रपूर, दि. २६ : पावसाळ्यापूर्वी चंद्रपूर शहरातील नालेसफाईची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहेत.

चंद्रपूर शहरातील मोठे व छोटे  नाले आणि गटारीमध्ये  पावसाचे पाणी तुंबल्यास ते नागरिकांच्या घरात साचून नागरिकांची गैरसोय होऊ शकते. ही बाब टाळण्यासाठी युद्धस्तरावर या सर्व नाल्यांची सफाई करणे, त्यातील गाळ काढणे, प्रसंगी नाल्यांचे रुंदीकरण करणे ही कामे करण्याचे निर्देश ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्तांना दिलेत.

मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी जेसीबी यंत्राचा वापर करावा, नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरांमध्ये कोणत्याही परिस्थितीत शिरणार नाही यासाठी नाल्यांचा प्रवाह सुस्थितीत ठेवण्याची सूचनाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बरेचदा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका असतो. विशेषत: नाल्यांच्या शेजारून गेलेल्या जलवाहिनींमध्ये गळती असल्यास हा धोका अधिक वाटतो. त्यातून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नाले, गटारी यांचे निर्जंतुकीकरण करावे. अशा सूचना पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्त यांना दिले आहेत.

00000

No comments:

Post a Comment