जिल्हाधिकाऱ्यांकडून तंबाखू नियंत्रण समन्वय समितीचा आढावा
चंद्रपूर, दि. 09 : चंद्रपूर जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या उद्देशाने तसेच तंबाखु नियत्रंण कायदा (कोटपा) 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम., अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किनाके, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.वनिता गर्गेलवार, एनटीसीपी सेलच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडाळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्हा तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत व्यापक जनजागृती करण्यात यावी. प्रत्येकी सहा महिन्यात महाविद्यालयस्तरावर प्रबोधनात्मक कार्यक्रम व शिबिरे सातत्याने राबवावीत. याकरीता शिक्षण विभागाची मदत घ्यावी. शासकीय / निमशासकीय कार्यालयामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्यावर प्रतिबंध घालावा, एखादा कर्मचारी तंबाखूचा वापर करत असल्यास दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, महानगरपालिकेने झोननिहाय तंबाखूमुक्त करण्याच्या उद्देशाने संयुक्त मोहीम राबवावी. आरोग्य यंत्रणेने विविध शासकीय कार्यालयात तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थावर आळा व वापरासंदर्भात जनजागृती पोस्टर्स व माहिती पत्रके लावावीत. जेणेकरून, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. आरोग्य व वनविभागाने संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवावी. असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यात आतापर्यंत तंबाखू नियंत्रणाबाबत करण्यात आलेली दंडात्मक कार्यवाहीची माहिती जाणून घेतली.
जिल्हा तंबाखू नियंत्रण व भरारी पथकाची धडक कार्यवाही:
जिल्हा तंबाखू नियंत्रण व भरारी पथकाने आज (दि.9 मे) रोजी राजुरा येथील बसस्थानक चौक, पंचायत समिती चौक, नाका क्रमांक-3 व ग्रामीण रुग्णालय राजुरा परिसरातील 19 पान टपरीवर धाड टाकून कोटपा कायदा 2003 अंतर्गत कार्यवाही केली. सदर कार्यवाही दरम्यान राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातील जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर, अन्न निरीक्षक प्रफुल टोपणे, पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, समुपदेशक मित्राजय निरंजणे, मधुकर बोबडे, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे, चंद्रकांत नेवलकर (प्र. तंत्रज्ञ) तसेच राजुरा पोलीस स्टेशन येथील चमू आदींची उपस्थिती होती.
00000
--
No comments:
Post a Comment