जलयुक्त शिवार, जलशक्ती अभियान व गाळमुक्त धरण योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा
चंद्रपूर, दि. 08 : जलयुक्त शिवार 2.0, जलशक्ती अभियान (कॅच द रेन) आणि गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आढावा घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महापालिका आयुक्त विपीन पालिवाल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, जिल्हा जलसंधारण अधिकारी आर.आर. बहुरिया, जि.प.जलसंधारण अधिकारी प्रियंका रायपुरे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष असणारी गावे जलयुक्त शिवार योजना 2.0 मध्ये प्राधान्याने घ्यावी. गावस्तरावर जलयुक्त शिवार संदर्भात समिती स्थापन करून तात्काळ अहवाल प्राप्त करून घ्यावा. गावांची निवड झाल्यानंतर प्रत्येक गावाकरीता एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. लोकसहभाग किंवा ज्या संस्था स्वयंस्फुरतेने जलयुक्त शिवार अभियान योजनेत योगदान देऊ इच्छितात, त्यांना प्राधान्याने समाविष्ट करून घ्यावे. जिल्ह्यातील मोठमोठ्या कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) सदर योजनेची कामे करण्याबाबत नियोजन करावे.
कॅच द रेन अभियानचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, नियमितपणे करण्यात येणारी कामे जलशक्ती अभियानच्या पोर्टलवर प्राधान्याने अपलोड करावीत. याबाबत सर्वांना पासवर्ड आणि लॉगीन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडीमध्ये वृक्षारोपण व जलसंधारची कामे करावीत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यातील किती व कोणत्या तलावातील गाळ काढायचा आहे, त्याची यादी संबंधित विभागाकडून मागवून घ्यावी. तसेच भारतीय जन संघटना, वेकोली, सिमेंट कंपनी, राष्ट्रीय महामार्ग आदींकडून गाळमुक्त धरण संदर्भात सीएसआर फंडचा वापर करण्याचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विनोद उध्दरवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, भारतीय जन संघटनेचे गौतम कोठारी उपस्थित होते.
०००००००
No comments:
Post a Comment