दिव्यांगांचा सुधारित सर्व्हे करा - जिल्हाधिकारी
Ø दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी जागा निवडीवर चर्चा
चंद्रपूर दि. 29 मे : जिल्ह्याला मंजूर झालेले दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी सुयोग्य जागेची निवड करून ते तातडीने सुरू करावे. तसेच दिव्यांगांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी घरोघरी जावून दिव्यांगांचा सुधारित सर्व्हे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज दिले.
केंद्र शासनाची जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ही योजना राबविण्यासाठी केंद्राच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्ह्यात दिव्यांग पुनर्वसन केंद्र मंजूर करण्यात आले आहे. हे केंद्र सुरू करण्यासाठी जागा निवड करण्याबाबत आज जिल्हास्तरीय व्यवस्थापन संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरूण गाडेगोणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी संग्राम शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत तसेच दिव्यांग प्रतिनिधी निलेश पाझारे याप्रसंगी उपस्थित होते.
केंद्र शासनाकडून दिव्यांग पुनर्वसन केंद्राकरिता मंजूर करण्यात आलेल्या सुविधेव्यतिरिक्त इतर आवश्यक बाबींच्या मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे सर्व वयोगटातील दिव्यांग व्यक्तींचा शोध घेवून त्यांचेसाठी आधुनिक कृत्रिम अवयव व साहित्य साधने पुरविणे, चिकित्सालयीन सोयी-सुविधा पुरविणे, दिव्यांग प्रमाणपत्र, बस पासेस, रेल्वे सवलत व इतर सेवा प्रदान करणे, शिक्षण व प्रशिक्षण देणे, व्यवसाय स्वयंरोजगारासाठी वित्तीय सहाय्य मिळवून देण्यात सहाय्य करणे व इतर सहाय्यभूत व पुरक सुविधा प्रदान करण्यात येणार आहे.
बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment