Search This Blog

Wednesday 19 August 2020

कृषी विभागाचा हवामान आधारित कृषी सल्ला

 

कृषी विभागाचा हवामान आधारित कृषी सल्ला

चंद्रपूर,दि.19 ऑगस्ट: जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तसेच काही ठिकाणी मध्यम पाऊस पडलेला आहे. हवामान आधारित कृषी विभागाने कृषी सल्ला दिलेला आहे. यानुसार शेतकऱ्यांनी शेतीची कामे करावीअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.

असा आहे हवामान आधारित कृषी सल्ला:

धान रोपे पुर्नलागवड ते वाढीची अवस्था:

धान पिकामधील जास्त पावसामुळे बांधीमधील साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. धान पिकात तणाच्या नियंत्रणासाठी रोवणीनंतर 5-6 दिवसात 3.75 लिटर बुटाक्लोरा+ 500 लिटर पाणी (75 मिली+ 10 लिटर पाणी) प्रती हेक्टरी या प्रमाणात वापरावे.

रोवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी तणाच्या नियंत्रणासाठी नॉमिनी गोल्ड (बीस पायरी बँक 10% एससी) 6-7 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रोवणीनंतर 25 दिवसानी तणाच्या नियंत्रणासाठी सिगमेंट (अझीमसल्फुरोन 50 टक्के डीएफ) 2-3 ग्रॅम किंवा कमांड (कलोम्यझोन 50 टक्के ईसी) 16 ते 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पुर्नलागवड झालेल्या धान पिकाची वाढीच्या प्राथमिक अवस्थेत 2 ते 3 सेमी पाण्याची पातळी ठेवावी.रोवणीसाठी रोपे काढण्याच्या दोन दिवस आधी वाफ्यातील पाण्याची पातळी थोडी वाढवावी. त्यामुळे मुळे न तुटता रोपे काढण्यास मदत होते. रोपांची लावणी 20 x 15 सेंमी अंतरावर 2 ते 5 सेंमी खोलवर लावावीत. प्रत्येक चुडात 2 ते 3 रोपे सरळ व उथळ ठेवावे.

धान रोपवाटीकेवर करपा रोगाचा प्रादुर्भावाची शक्यता असून व्यवस्थापनासाठी कार्बनडान्झीम 50 टक्के डब्लूपी 10 ग्रॅम किंवा म्यान्कॉझेब 75 टक्के प्रवाही यापैकी कोणत्याही एका बुरशी नाशकाची फवारणी 10 लिटर पाण्यात मिसळून लागवडीनंतर 10 दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.

उशिरा रोवणी-  रोपांची शेंडे खुडून लावणी 15 x 15 सेमी अंतरावर 2 ते 4 सेमी खोलवर लावावीत. प्रत्येक चुडात चार ते पाच रोपे सरळ व उथळ ठेवावे.

माती परीक्षण अहवालानुसार चिखलणी करताना 50 किलो स्फुरद (सिंगल सुपर फास्फेट स्वरूपात 313.5 किलो) + 50 किलो पालाश (एमओपी स्वरूपात 83 किलो) नत्रयुक्त खताची निम्मी मात्रा 50 किलो नत्र म्हणजेच (युरिया स्वरूपात 107 किलो) प्रति हेक्टरी बांधीत मिसळावी व बांधीतील पाणी बांधून ठेवावे.

जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास झिंक सल्फेट 20 किलो प्रती हेक्टरी चिखलावर द्यावे.

सोयाबीन वाढीची अवस्था:

सोयाबीन पिकावर चक्रीभूंगा व खोडमाशी आढळल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस 40 टक्के 12.5 मिली किंवा क्लोराट्रोनिप्रोल 18.5 एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकावर तंबाखूची पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा इंडोक्सीकार्ब 15.8 टक्के एससी 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कापूस वाढीच्या अवस्था:

कपाशी पिकामध्ये जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा चराद्वारे निचरा करावा. रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्क किंवा असीटामीप्रीड 20 टक्के एसपी 2 ग्रॅम किंवा 5 टक्‍के प्रवाही 30 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. शेंदरी बोंडअळीच्या निरीक्षणासाठी प्रति हेक्‍टरी 8 कामगंध सापळे लावावेत. डोमकळी आढळल्यास नेहमीत दर आठवड्यांनी अळीसहित वेचून नष्ट करावे. पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी नत्र खताची दुसरी मात्रा (कोरडवाहू 30 व ओलीत 40 किलो/ हेक्‍टरी) जमिनीत भरपूर ओल असतांना देऊन लगेच डवरणी करावी.

तुर फांद्या येण्याची अवस्था:

तुर पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास त्याच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. धान बांधीच्या धुऱ्यावर तूर पिकातील आंतरमशागतीची कामे पूर्ण करून घ्यावे तसेच तणांचे नियंत्रण करण्यासाठी एक किंवा दोनदा निंदणी करून घ्यावे.

तीळ-वाढीची अवस्था:

धान बांधीच्या धुऱ्यावर तीळ पिकातील तणांच्या नियंत्रण करण्यासाठी एक किंवा दोनदा निंदणी करून घ्यावी.

भेंडी-वाढीची अवस्था:

भेंडी पिकाकरीता रासायनिक खताच्या मात्रेमध्ये हेक्टरी 50 किलो नत्र 50 किलो स्फुरद दयावे. त्यापैकी अर्धी नत्राची व संपूर्ण स्फुरदाची मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी तसेच उरलेली नत्राची अर्धी मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावी. लागवड झालेल्या पिकामध्ये आंतरमशागतीची कामे करावीत.

हळद वाढीची अवस्था:

हळद पिकामधील जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा चराद्वारे निचरा करावा. खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास प्रादुर्भावग्रस्त पाने काढून जाळून टाकावे व निंबोळी अर्क पाच टक्के किंवा निंबोळी तेल 20 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मिरची वाढीची अवस्था:

मिरची रोपांची लावणीनंतर 25 दिवसांनी शेंडेमर, फडसड (फांद्या वाळणे) रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास प्रादुर्भावग्रस्त फांद्या काढून जाळून टाकावे व नियंत्रणासाठी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड किंवा मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा प्रापीनेब 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी घेऊन 15 दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्या.

भाजीपाला- वाढीची अवस्था:

भाजीपाला पिकामधील जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा चराद्वारे निचरा करावा. वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये फळमाशीच्या निरीक्षणासाठी एकरी दोन आमिष सापळे लावावेत. रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी रोगर 1.25 मिली प्रतिलिटर तसेच बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी डायथेन एम-45,  2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.

रासायनिक तणनाशक व किटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहूनच करावी. फवारणी करताना आवश्यक काळजी घ्यावी,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment