Search This Blog

Wednesday, 14 May 2025

इरई नदी खोलीकरणासाठी उद्योगांचाही पुढाकार

 

इरई नदी खोलीकरणासाठी उद्योगांचाही पुढाकार

चंद्रपूरदि. 14 मे : चंद्रपूर शहरात होत असलेल्या इरई नदीच्या खोलीकरण अभियानात आता जिल्ह्यातील उद्योगांनीही पुढाकार घेतला आहे. विविध उद्योगांनी आपल्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) नदीच्या खोलीकरणासाठी साहित्य उपलब्ध करून दिले असून यात पोकलेन, टिप्पर आणि हायवा यांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते 25 एप्रिल रोजी करण्यात आला. पहिल्या टप्प्यात रामसेतू ते चौराळा पूल या दरम्यान खोलीकरण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत चार ठिकाणी काम सुरू आहे. यासाठी लॉयड्स मेटल्स कंपनीने सीएसआर निधीतून 3 पोकलेन मशीन तसेच 6 टिप्पर / हायवा उपलब्ध करून दिले आहेत. तर अल्ट्राटेक सिमेंट उद्योगाने 1 पोकलेन मशीन आणि 2 हायवा खोलीकरणासाठी दिले आहेत.

याशिवाय चार वेगवेगळ्या ठिकाणावर एकूण 8 पोकलेन मशीन कार्यरत असून यात जलसंपदा विभागाचे 3, सीएसआर निधीतून 1 आणि चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या 4 पोकलेनचा समावेश आहे. तसेच खोलीकरणासाठी एकूण 13 टिप्पर / हायवा, जेसीबी आणि 21 ट्रक्टर कार्यरत आहेत. आतापर्यंत नदी पात्रातून 21 टीसीएम गाळ (अंदाजे 7500 ब्रास) काढण्यात आला असून 26 शेतक-यांना 1158 ब्रास गाळ मोफत वाटप करण्यात आला आहे. गाळ नेण्यासाठी  आतापर्यंत 42 शेतक-यांनी अर्ज केले आहेत.

शासन, प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून इरई नदी खोलीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील इतरही उद्योगांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment