बियाणे खरेदी करताना खबरदारी घ्यावी
Ø कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन
चंद्रपूर, दि. 7 मे : खरीप हंगामाला आता सुरवात होणार आहे. शेतक-यांच्या दृष्टीने हा अतिशय
महत्वाचा हंगाम आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्ह्यातील
शेतकऱ्यांनी परवानाधारक विक्रेत्याकडून बियाणे, खते
खरेदी करावेत. विक्रीचा
परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठा खरेदी करावी, तसेच
गावोगावी फिरणाऱ्या एजंटकडून कोणतेही बियाणे घेऊ नये, असे आवाहन कृषी जिल्हा
अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
कृषी विभागाने म्हटले की, शेतक-यांनी
प्रतीनुसार आणि पिकाच्या गरजेनुसार योग्य बियाण्याची जात निवडावी. याकरिता स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला
घ्यावा. शेतकयांनी बियाण्यांच्या पॅकेटवर कंपनीचे नाव, लॉट
नंबर, उत्पादन तारीख, अंतिम तारीख, वाणाचे
नाव, उगवण क्षमतेची टक्केवारी आणि पाकिटावर छापलेले लेबल तपासावे. स्थानिक हवामान, बियाणे
स्वच्छ, रोगमुक्त आणि एकसमान आकाराचे असावे. कचरा, खराब
बियाणे किंवा कीड नसावी. बियाण्याला बीजप्रक्रिया
केली आहे का? असल्यास कोणत्या औषधाची केली आहे ते तपासा, नसल्यास
कोणत्या औषधाची बीजप्रक्रिया करावी, याचा सल्ला कृषीतज्ज्ञांकडून घ्या. अंतिम तारीख
पूर्ण झालेले बियाणे खरेदी करू नये, कारण त्याची उगवण क्षमता कमी असते. खरेदीचे
अधिकृतचे पक्के बिल घ्या, जेणेकरून तक्रार असल्यास पुरावा मिळेल.
हायब्रिड बियाणे घेतल्यास त्याच्या
लागवडीसाठी विशेष काळजी आणि खते याची माहिती घ्या. खरेदी केलेले बियाणे कोरड्या
आणि थंड ठिकाणी साठवा, जेणेकरून त्याची गुणवत्ता टिकेल. शक्य असल्यास स्थानिक कृषी अधिकारी किंवा
तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बियाणे निवडा. विकत घेतलेल्या बियाण्याचे पाकीट आणि बिल
जपून ठेवावे. विकत घेतलेल्या बियाणांची पाकिटे, अधिकृत
बिल आणि थोडेफार बियाणे हंगाम संपेपर्यंत राखून ठेवावे. जेणेकरून तक्रार करावयाची
झाल्यास पुरावे म्हणून ग्राह्य मानले जातात. पेरणीच्या वेळेस बियाण्याची पिशवी
शिलाई केलेल्या बाजूने न फोडता खालील बाजूने फोडावी. जेणेकरून पिशवीवरील टॅग व
लेबल चांगले राहतील व ते टॅग आणि लेबल सांभाळून ठेवावे. या गोष्टींची काळजी घेतल्यास चांगल्या
प्रतीचे बियाणे मिळेल आणि पिकाचे उत्पादन वाढेल.
शेतकरी बांधवांनी स्वस्त बियाण्यांच्या अमिषाला
बळी न पडता अधिकृत कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करावेत. त्याची पावती घेऊन तो
जपून ठेवावी. शेतकऱ्यांच्या बियाणेसंदर्भात तक्रारी असल्यास त्यांनी कृषी विभागाशी
संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर
तोटावार यांनी म्हटले आहे.
००००००
No comments:
Post a Comment