Search This Blog

Tuesday, 13 January 2026

सिकलसेल मुक्तीसाठी प्रशासनाची ‘अरुणोदय’ मोहीम

 

सिकलसेल मुक्तीसाठी प्रशासनाची ‘अरुणोदय’ मोहीम

Ø 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत तपासणी

चंद्रपूर, दि. 13 : जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता या आजाराला मुळापासून आळ घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्याला सिकलसेल मुक्त करण्यासाठी ‘अरुणोदय’ ही विशेष तपासणी मोहीम 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

सिकलसेल आजार नुवंशिक रक्तविकार असून तो केवळ रक्त तपासणीद्वारेच ओळखता येतो. त्यामुळे या मोहिमेंतर्गत सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने तपासणी करून घ्यावी. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा तपासणी मोहिमेकरीता सज्ज करण्यात आल्या आहेत. दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहचून तपासणी, निदान व आवश्यक उपचार करण्यावर भर देण्यात येणार आहे.

सिकलसेलची लक्षणे : सिकलसेलमध्ये वाहक व रुग्ण असे दोन प्रकार असतात. वारंवार ताप येणे, सांधेदुखी, अशक्तपणा, रक्तक्षय इत्यादी लक्षणे दिसताच नागरिकांनी त्वरित तपासणी करून घ्यावी. शासकीय उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

रुग्णांसाठी सवलती : सिकलसेल रुग्णासाठी शासनातर्फे विविध सवलती दिल्या जात आहेत. संजय गांधी निराधार योजना, एसटी प्रवास सवलत, विद्यार्थ्यांसाठी परीक्षेदरम्यान अतिरिक्त वेळ यांसारख्या सुविधांचा लाभ रुग्णांना मिळणार आहे. सिकलसेल मुक्त चंद्रपूरच्या दिशेने ‘अरुणोदय’ ही एक निर्णायक पायरी आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने रक्त तपासणी करून या मोहिमेत सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे यांनी केले आहे.

विवाहपूर्व तपासणी करा : सिकलसेल आजार माता-पित्याकडून मुलांकडे संक्रमित होतो. त्यामुळे समाजात जनजागृती करणे अत्यंत महत्वाचे आहे. शिक्षक, पालक व युवकांनी विशेष काळजी घ्यावी. सिकलसेल साखळी तोडण्यासाठी विवाहपूर्व तपासणी करणे अत्यावश्यक आहे.

आरोग्य मंत्र आत्मसात करा : सिकलसेल रुग्णांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे, पौष्ठिक आहार घ्यावा, थंडी-उन्हापासून संरक्षण करावे तसेच नियमित उपचार घ्यावेत. योग्य काळजी घेतल्यास रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतात.

००००००

No comments:

Post a Comment