शेतकऱ्यांनी कापूस पीकाचे व्यवस्थापन करावे: डॉ.उदय पाटील
जाणून घेऊया! कापूस लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन
चंद्रपूर,दि.4 ऑगस्ट: जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात पीक घेतल्या जाते. त्याच बरोबर अनेक शेतकरी कापूस पीक सुध्दा घेतात. कापूस लागवड तंत्रज्ञान जाणून घेऊन व्यवस्थापन करणे महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस पिकाद्वारे अधिक उत्पादन, आर्थिक मिळकतीसाठी ऑगस्ट महिन्याचे कापूस पीकाचे व्यवस्थापन करण्याचे, आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.
असे करावे व्यवस्थापन:
कपाशीचे पीक फुलावर असतांना ताण पडल्यास व पाणी देण्याची सोय असल्यास 10-12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 संरक्षित ओलीत एकसरी आड द्यावे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत किया शेवटच्या डवरणीच्यावेळी डवऱ्याच्या दात्याला दोरी बांधून सरी काढावी. त्यामुळे पाण्याचे मुलस्थानी संधारण होऊन अधिक पिक उत्पादन मिळले. कपाशी पिकामध्ये पेरणी नंतर 40 ते 60 दिवसांनी सऱ्या काढाव्यात व अतिवृष्टी झाल्यास जास्तीचे पाणी चर काढून बाहेर काढावे.
गुलाबी बोंड अळी सर्वेक्षणासाठी हेक्टरी 5 फेरोमोन सापळे पिकापेक्षा एक ते दिड फूट उंचीवर लावून त्यामध्ये गुलाबी बोंडअळीचे लिंग प्रलोभने (ल्युर) गॉसीयल्युर बसवावे. कपाशी पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 टक्के + 150 ग्रॅम युरिया 10 लिटर पाण्यात घेऊन प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या बुंध्याशी पाठीवरच्या पंपाच्या सहाय्याने आंबवणी करावी व झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्यावे. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असतांना 2 टक्के युरिया (2 किलो युरिया + 100 लिटर पाणी) फवारणीत 50 मिली प्लानोफिक्स मिसळावे.
नत्रयुक्त खतांचा वरखते म्हणून वापर करतांना बागायती कपाशीसाठी 1/3 नत्राची मात्रा उगवणीनंतर एक महिन्यांनी आणि उरलेली 1/3 नत्राची मात्रा उगवणीनतर दोन महिन्यांनी द्यावी. ठिबक संचातून खतमात्रा देतांना ती पिकाचे वाढ अवस्थेनुसार लागवडीपासुन 20 दिवसाच्या अंतराने पाच समान भागात द्यावी. रासायनिक खते महाग असल्यामुळे त्याचा वापर करतांना त्याचा तणाऐवजी पिकास भरपूर फायदा होईल अशी दक्षता घ्यावी. तसेच नत्रयुक्त खते पिकांना विभागून दिल्यास त्याचा पिकांना भरपूर फायदा होऊन खतांची कार्यक्षमता सुध्दा वाढते.
ठिबक सिंचनाव्दारे सुध्दा पाण्यात विरघळणारी जी खते आहेत ती पिकांच्या गरजेनुसार व पिक अवस्थेनुसार दिल्यास खतांची बचत होईल व खतांची कार्यक्षमता सुध्दा वाढेल. ठिबक सिंचनाव्दारे रासायनिक खते देण्याची सोय असल्यास पाण्यात विरघळणारी खते पिकानुसार व पिकांच्या वाढीच्या अवस्थे नुसार विभागुन दिल्यास रासायनिक खतांची कार्य क्षमता वाढते व उत्पादनात वाढ होते.
बिटी कापुस पिकामध्ये अधिकउत्पादन, आर्थिक मिळकत व खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठिबक सिंचनाव्दारे शिफारसीच्या 100% नत्र व पालाश पाच वेळा विभागुन तसेच स्फुरद पेरणी सोबत जमीनीतुन देण्याची शिफारस विद्यापिठाची आहे. वरील खताची मात्रा ठिबक सिंचनाव्दारे पुढील प्रमाणे विभागून द्यावी.
शिफारशीच्या 10 टक्के नत्र व पालाश इतकी खतमात्रा पेरणीच्या वेळी द्यावी. शिफारशीच्या 20 टक्के नत्र व पालाश इतकी खतमात्रा पेरणीनंतर 20 दिवसांनी द्यावी. शिफारशीच्या 25 टक्के नत्र व पालाश इतकी खतमात्रा पेरणीनंतर 40 दिवसांनी द्यावी. शिफारशीच्या 25 टक्के नत्र व पालाश इतकी खतमात्रा पेरणीनंतर 60 दिवसांनी द्यावी. शिफारशीच्या 20 टक्के नत्र व पालाश इतकी खतमात्रा पेरणीनंतर 80 दिवसांनी द्यावी.
000000
No comments:
Post a Comment