Search This Blog

Friday 25 March 2022

कृषी विभागामार्फत उकीरडा मुक्त गाव, खतयुक्त शिवार अभियान

 

कृषी विभागामार्फत उकीरडा मुक्त गाव, खतयुक्त शिवार अभियान

          चंद्रपूर दि.25 मार्च : गावात प्रत्येक कुटुंबाचा स्वतःचा उकिरडा असतो. गावातील आणि घरातील कचरा कधी उकिरड्यावर, कधी रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागांवर फेकला जातो. बहुतेक कुटुंब शेतकरी असल्यामुळे प्रत्येकाच्या घराला लागून जनावरांचे गोठे असतात. दुभती जनावरे, बैल, आणि शेळ्या-मेंढ्या गोठ्यात बांधलेल्या असतात. त्यांचे शेण-मूत्र, वाया गेलेला चारा उकिरडात भर टाकतो. वाऱ्याच्या झोताने उकिरड्यावरील वाळलेला कचरा, कागद, प्लॅस्टिक गावभर पसरतात, यामुळे गावात अस्वच्छता पसरते. या उकिरडामधील काडी, खचरा, शेण आदि यापासून कंपोस्ट खत तयार केल्यास गाव उकिरडा मुक्त होऊन खतयुक्त शिवार होईल, यामुळे गावे स्वछ होऊन शेतीसाठी खत उपलब्ध होईल. यासाठी कृषी विभागामार्फत गावागावात उकीरडा मुक्त गाव, खत युक्त शिवार अभियान राबविल्या जात आहे.

कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रीय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत आहे. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदोर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.

नॅडेप कंपोस्ट खत पदधत:

              ही पद्धत यवतमाळ जिल्हयातील पुसद येथील शेतकरी नारायणराव देवराव पांढरीपांडे यांनी गोधन केंद्रात त्यांच्या स्वत:च्या प्रयोगशिलतेतून विकसित केली. या पध्दतीने जमिनीवर पक्क्या विटांच्या सहाय्याने 10 फूट लांब, 6फूट रूंद व 3 फूट उंच अशा आकाराचे टाकीचे बांधकाम केले जाते. विटांच्या दोन ओळीनंतर तिस-या ओळीत खिडक्या ठेवल्या जातात. या पध्दतीमध्ये सुमारे एक ते दीड टन काडीकचरा, 100 किलो ग्रॅम शेण, दीड टन चाळलेली माती भरली जाते. नॅडेप पध्दतीमध्ये सर्वात खालचा थर चांगला ठोकून शेणाचा सडा टाकून घेतात. त्यानंतर 6 इंच जाडीचा काडीकचरा थर व इतर सेंद्रीय पदार्थाचा थर देउन त्यावर 100 लिटर पाण्यात 4 ते 5 कि.ग्रॅ. शेण मिसळून  शिंपडले जाते. यानंतर साधारणत: 1 ते 2 इंच जाडीचा चाळलेला मातीचा अर्धा थर देउन परत पाणी शिंपडून ओलावा केला जातो. अशाप्रकारे 3 ते 4 महिण्यात उत्कृष्ट कंपोस्ट तयार होते.

उकीरडयाचे तोटे :

गावातील आणि घरातील कचरा कधी उकिरड्यावर, कधी रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागांवर फेकला जातो. गावातील दुभती जनावरे, बैल, आणि शेळ्या-मेंढ्या त्यांचे शेण-मूत्र, वाया गेलेला चारा उकिरडात भर टाकतो. वा-याच्या झोताने उकिरड्यावरील वाळलेला कचरा, कागद, प्लॅस्टिक गावभर पसरतात, यामुळे गावात अस्वच्छता,  दुर्गध पसरते गावे अस्वच्छ होतात. जनावरे, बैल, आणि शेळ्या-मेंढ्या त्यांचे शेण-मूत्र, वाया जात असल्याने कंपोस्ट खताचा वापर कमी होवून रासायनीक खतावरील खर्च वाढतो. यामुळे उत्पादन खर्च वाढते.

 

गांडुळ खत पध्दतीचे फायदे:

बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर जसा परिणाम होत आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला कमी झालेल्या जमिनीचा कसही कारणीभूत आहे. संकरित जाती आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता यामुळे शेतकरी एकापेक्षा जास्त हंगामांमध्ये एकापाठोपाठ पिके घेत आहे, त्यामुळे जमिनीला विश्रांती मिळत नाही. खते आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने हजारो जमिनी क्षारपड झाल्या आहेत. अशा मानवनिर्मित समस्या सोडविण्यासाठी उपाय योजावे लागणार आहेत. जमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर होणे आवश्यक आहे. त्यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते. शेतामध्ये उपलब्ध असलेला टाकाऊ स्वरूपाचा काडीकचरा,गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र, पिकाचे उरलेले अवशेष, तसेच बांधावरील पानगळ इत्यादी अवशेषांचे जिवाणूंच्या सहयोगाने कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत होय.

गांडूळ खताचे फायदे:

गांडूळ खतामधील अन्नद्रव्ये पिकाला आवश्यक अशा स्वरूपात उपलब्ध असतात. गांडूळ मधील सूक्ष्मजीवांमुळे रोगनिर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो. पिकावर येणारी रोगराई कमी होते. त्यामुळे कीडनाशकांचा खर्च कमी होतो. गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची जलधारण क्षमता वाढते. गांडूळ खताची रचना कणीदार असते त्यामुळे ते मातीचे कण धरून ठेवते व वाऱ्यामुळे, पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते. तरी, सर्व शेतक-यांनी गांडुळ खत पद्धतीचा अवलंब करून उत्तम कंपोस्ट खताची निर्मिती करावी, व त्याचा वापर करून जमिनीचा पोत व उपजाऊशक्ती कायमस्वरूपी राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. यामुळे खताची समस्या सोडविण्यास हातभार लागेल. व रासायनीक खताचा खर्च कमी होवून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल व त्यामुळे उत्पन्नात भर पडून जमीनीचा पोत सुधारेल. शेतकरी बंधुनी उकीरडा मुक्त गाव, खत युक्त शिवार या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिका-यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment