Search This Blog

Monday, 28 March 2022

क्षयरोग दूरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रीत करावे - डॉ.मिताली सेठी




 

क्षयरोग दूरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रीत करावे -   डॉ.मिताली सेठी

Ø जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर दिनांक 28 मार्च :  आरोग्य यंत्रणेने समन्वयाने व  सहभागाने कार्य केल्यास केंद्र शासनाने ठरविल्याप्रमाणे 2025 पर्यंत क्षयरोग दूरीकरणाचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य करता येईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले. जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत,  डॉ. संदीप गेडाम,  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद्र किन्नाके, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सचिव अनुप पालीवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येतो, असे सांगून डॉ. सेठी म्हणाल्या, जिल्ह्यात क्षयरोग दूरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने समन्वयाने व सहभागाने कार्य करावे. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढवावा. तसेच क्षयरोगाबाबत  समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनजागृतीसाठी करावी.

आरोग्य यंत्रणेने कोविड-19 मध्ये  केलेले कार्य प्रशंसनीय आहे. ज्या पद्धतीने कोरोनाला नियंत्रित केले, त्याच जोमाने क्षयरोगाविरुद्ध कार्य केल्यास क्षयरोग दुरीकरण मोहीम यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही, असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर म्हणाल्या.

यावेळी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त, क्षयरोग  केंद्र, चंद्रपूर येथून क्षयरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  मान्यवरांनी  हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. या रॅलीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, प्रभादेवी नर्सिंग महाविद्यालय येथील विद्यार्थी, वैद्यकीय अधिकारी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी तसेच जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

क्षयरोग दिनानिमित्त 2021 मध्ये उत्कृष्ट टीबी नोटीफिकेशन केल्याबद्दल डॉ. शरयू पाझारे, डॉ. आनंद बेंडले, डॉ. भारत गणवीर, डॉ. कोतपल्लीवार, डॉ. पंत या खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आशाधाम हॉस्पिटल राजुरा, रोशन आकुलकर अध्यक्ष संकल्प बहुउद्देशीय संस्था, प्रतिसाद बहुउद्देशीय विकास संस्था या उत्कृष्ट सहकार्य करणाऱ्या अशासकीय संस्था व स्वयंसेवी संस्थांना तर राजुरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहुजी कुळमेथे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नगराळे यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

क्षयरोग  जनजागृतीसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सचिन हस्ते यांनी तर आभार हेमंत महाजन यांनी मानले.

00000

No comments:

Post a Comment