प्राथमिक शिक्षकांचे भविष्यवेधी शिक्षण विचार प्रशिक्षण
चंद्रपूर दि. 4 मार्च : आदिवासी आश्रमशाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सार्वत्रिक उपलब्धतेबरोबरच गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे हे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे ध्येय आहे. या अनुषंगाने चंद्रपूर व चिमूर प्रकल्प कार्यालयांतर्गत येणा-या शासकीय आदिवासी आश्रम शाळांमधील प्राथमिक शिक्षकांकरीता तीन दिवसीय जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार प्रशिक्षण घेण्यात आले.
विकास केंद्र चंद्रपूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) नीलय राठोड यांनी केले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) आर.टी.धोटकर, एस.एल.खडसे, चिमूर येथील ए.एम. बेलेकर उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा शिक्षण व्यवस्थेत समावेश करण्यास, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यास, भविष्यवेधी शिक्षण विचार आवश्यक आहे. ही शिक्षण प्रणाली मुलांना स्वत: शिकण्यास प्रेरीत करणे, मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे, प्रोत्साहन देणे या सुत्रांवर काम करते. यासदंर्भात नागपूर येथील अपर आयुक्त कार्यालयातील एस.के.बन्सोड यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तर शिल्पा सुर्यवंशी आणि वासंती गोमासे यांनी विद्यार्थ्यांची वैचारीक समृध्दी उत्तमपणे घडविण्यास भविष्यवेधी शिक्षण आवश्यक असल्याचे मत मांडले. तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणात चंद्रपूर व चिमूर प्रकल्पातील 38 शिक्षकांनी सहभाग नोंदविला.
००००००००
No comments:
Post a Comment