Search This Blog

Sunday, 13 March 2022

महिला उत्पादक कंपन्यांच्या निर्मितीसाठी सीडीसीसी बँकेने पुढाकार घ्यावा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 





महिला उत्पादक कंपन्यांच्या निर्मितीसाठी सीडीसीसी बँकेने पुढाकार घ्यावा पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø मूल येथे स्वयंसहायता महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा

चंद्रपूर, दि. 13 मार्च : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचत गटांचे जाळे उभे करण्यात आले आहे. या महिला स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत असून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी छोट्या छोट्या व्यवसायात उतरल्या आहेत.  महिलांच्या या व्यवसायाला बँकेचे आर्थिक पाठबळ आहे. मात्र आणखी एक पाऊल पुढे म्हणून आता महिलांच्या उत्पादक कंपन्या निर्मितीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

मूल येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आयोजित स्वयंसहायता महिला बचत गट मार्गदर्शन मेळाव्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, संचालक संदीप गड्डमवार, पं.स.सभापती विजय कोरेवार, प्रा. मोटघरे, व्यवस्थापक श्री. कल्याणकर यांच्यासह बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.

अनेक क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, महिलांना संधी मिळाली की, त्या संधीचं सोनं करतात. आजची महिला कुठेही कमी नाही. शिवाय ती स्वाभिमानाने जगते. कर्जासाठी आपल्या दारात कुणी आलेलं तिला पाहावत नाही. त्यामुळे आज महिला बचत गटांकडून बँकेच्या कर्जाचे परतफेडीचे प्रमाण 90 टक्क्यांच्या वर आहे. तर दुसरीकडे पुरुषांच्या बचत गटाची थकबाकी वाढत असल्याचे निदर्शनास येते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एका चांगल्या व्यक्तिच्या हातात आहे. दुर्धर आजारात शेतक-यांना, महिलांना मदत करणारी ही एकमेव बँक आहे. ज्यांना इतर बँका नाकारतात, त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज स्वरुपात पाठबळ देऊन कुटुंबाला उभे करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. यापुढे आता बँकेने महिला उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. एका गावात दोन कंपन्या उभ्या राहिल्या पाहिजे, या दृष्टीने नियोजन करा.

महिला सक्षमीकरणाबाबत श्री. वडेट्टीवार म्हणाले, माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे भारतातील महिला सक्षम झाल्या आहेत. जिल्ह्यात दरवर्षी महिला सक्षमीकरणासाठी 25 कोटी रुपयांचा निधी दिला जातो. यात महिलांना ट्रॅक्टरपासून तर कृषी अवजारांपर्यत वाटप करण्यात येते. नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने अर्थसंकल्पात नुकताच जाहीर केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणा-या प्रगती महिला बचत गट, गृहिणी स्वयंसहायता महिला बचत गट, सावित्री महिला बचत गट, अनुसया महिला बचत गट, शारदा स्वयंसहायता महिला बचत गट, सरस्वती महिला बचत गट, रमाबाई महिला बचत आदींना तसेच शेतकरी कल्याण निधी अंतर्गत दुर्धर आजार असलेल्या कुटुंबातील सुमित्रा मोहुर्ले, राकेश घुपतवार, केशव महाजनवार, शालू गणवीर आदींना धनादेश वाटप करण्यात आले.

तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरवातील महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने सुरवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. कल्याणकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

०००००००००

No comments:

Post a Comment