Search This Blog

Thursday 10 March 2022

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता अर्ज आमंत्रित 16 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता अर्ज आमंत्रित

Ø 16 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.10 मार्च : आदिवासी उमेदवारांकरीता वर्ग-3 व वर्ग-4 पदाकरिता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेण्याकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे दि. 1 एप्रिल ते 15 जुलै 2022 पर्यंत साडेतीन महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण दि. 1 एप्रिल 2022 पासून सुरू होणार असून प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 1000/- इतके विद्यावेतन देय राहील.

स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणास इच्छुक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. 16 मार्च 2022 पर्यंत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे सादर करावेत. अर्ज सादर करतांना विहित नमुन्यातील अर्जामध्ये स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, जातीचा प्रवर्ग तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांचा नोंदणी क्रमांक नमूद करून आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे जोडावीत. अर्ज करण्याकरीता उमेदवाराकडे एम्प्लॉयमेंट कार्ड असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांना मुलाखतीचा दिनांक नमूद मोबाईल क्रमांकावर कळविण्यात येईल तर पात्र उमेदवारांची निवडयादी त्याच दिवशी सायंकाळपर्यंत कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल.

या आहेत प्रशिक्षणाच्या अटी व आवश्यक कागदपत्रे:

उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. उमेदवाराची किमान वय 18 ते 38 च्या दरम्यान असावे. उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदणी केलेली असावी.

उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका उमेदवाराचे आधारकार्ड तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे नोंदणीकार्ड असणे आवश्यक आहे. तरी, जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज सादर करावेत.व संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या  मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे.

00000

No comments:

Post a Comment