Search This Blog

Friday, 11 March 2022

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी 13 हजार प्रकरणे


राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी 13 हजार प्रकरणे

Ø ऑनलाईन पध्दतीनेही नोंदविता येणार सहभाग

चंद्रपूर दि. 11 मार्च : जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये 12 मार्च रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुमारे 13 हजार प्रकरणे आपसी तडजोडीसाठी ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने दिली आहे.

जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुका न्यायालयामध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित दिवाणी, फौजदारी, कलम 138 एन.आय. ॲक्ट (धनादेश न वटणे), बँकांची कर्जवसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक – भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद (घटस्फोट वगळता), इलेक्ट्रिसीटी ॲक्टचे समझोतायोग्य वाद तसेच न्यायालयात येण्याअगोदरची प्रकरणे, महसूल, पाणीपट्टी, वीज बिल वसुली दावे आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात येत आहे. यात 3729 प्रलंबित प्रकरणे तर 8951 प्रि-लिटीगेशन व अन्य गुन्हाकबुली प्रकरणांचा समावेश राहील.

ज्या पक्षकारांना लोकअदालतीकरीता न्यायालयात प्रत्यक्ष येणे शक्य नाही, अशा पक्षकारांना ऑनलाईन पध्दतीने सहभाग नोंदविता येणार आहे. यासाठी राज्य विधीसेवा प्राधिकरणाने ‘सामा’ कंपनीची मदत घेतली आहे. या लोकअदालतीत चंद्रपूर जिल्हा ग्राहक संरक्षण आयोग सहभागी होत असून सदर कार्यालयातील तडजोडपात्र प्रकरणेसुध्दा ठेवण्यात आली आहेत.

सदर लोकअदालतीमध्ये वाहतूक विभागाची प्रि-लिटीगेशन प्रकरणे ऑनलाईन पध्दतीने ठेवण्यात आली असून वाहतूक नियमांचे उल्लंघन आदींबाबत सुचनापत्रे संबंधित व्यक्तिंना मोबाईलवर पाठविली आहे. तसेच दंड रक्कम ऑनलाईन भरण्यासाठी लिंक दिली आहे. नागरिकांनी या सुलभ पध्दतीचा वापर करून वेळ, पैसा, श्रम याची बचत करावी. जिल्ह्यातील विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता अग्रवाल यांनी केले आहे.

००००००० 

No comments:

Post a Comment