Search This Blog

Monday 28 March 2022

‘मार्च एंडिंग’ खर्चाबाबत पालकमंत्र्यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

 




‘मार्च एंडिंग’ खर्चाबाबत पालकमंत्र्यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

चंद्रपूर, दि. 28 मार्च :  चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन ते चार दिवस राहिले आहे. या वर्षात जिल्हा नियोजन समिती, खनिज विकास निधी आणि आदिवासी विकास निधीअंतर्गत विविध विभागांना विकास कामांसाठी देण्यात आलेल्या निधीच्या खर्चाबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ आदी उपस्थित होते.

बहुतांश विभागाचा निधी खर्च झाला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, कोणत्याही विभागाचा निधी शिल्लक असल्यास तो त्वरीत वळता करावा. जेणेकरून इतर विभागाला सदर निधी वेळेत देता येईल. मेंडकी आणि एकारा येथे आरोग्य व्यवस्थेसाठी मागणीप्रमाणे निधी उपलब्ध करून द्या. जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय तसेच चारवाढीसाठी पशुसंवर्धन विभागाने नियोजन करावे. ग्रामीण भागात उभारण्यात येणारे वाचनालय चावडीसारखे असावे. जेणेकरून सहजरितीने विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल.

जिल्ह्यातील पारधी बेड्यांवर जलशुध्दीकरण यंत्र तसेच हायमास्ट बसविण्याकरीता आदिवासी विकास विभागाने निधीची तरतूद करावी. जिल्ह्यात करडई पिकाचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच महाज्योतीच्या माध्यमातून 100 तेल घाणीचे क्लस्टर तयार करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांनी आराखडा तयार करून द्यावा. प्रत्येक तालुक्यात पाच मॉडेल शाळा तयार करण्यासाठी निधी देणार असून आरोग्य विभागाला फायर ऑडीटकरीता अतिरिक्त निधी दिला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीला विविध विभागाचे प्रमुख तसेच अधिकारी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment