तृणधान्य पिकाचे उत्पादन व शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी
प्रयत्न करा - पालक सचिव अनुपकुमार
Ø जिल्ह्यातील विविध प्रकल्प व योजनांचा आढावा
चंद्रपूर दि. 21: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता आहे. मात्र जिल्ह्यात तृणधान्य पिकाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी तसेच तृणधान्याचे आहारातील महत्त्व लक्षात घेऊन या पिकाचे उत्पादन व शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा, अशा सुचना अपर मुख्य सचिव (कृषी) तथा जिल्ह्याचे पालक सचिव अनुप कुमार यांनी कृषी विभागास दिल्या. नियोजन भवन सभागृह येथे जिल्ह्यातील विविध प्रकल्प व योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
तृणधान्य पिकाच्या उत्पन्न वाढीमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असे सांगून पालक सचिव अनुप कुमार म्हणाले, शेतकऱ्यांना तृणधान्याचे महत्त्व पटवून द्या, तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करावा ज्यामध्ये, प्रगतशील शेतकरी तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीना सहभागी करावे. शेतकऱ्यांच्या ई-केवायसीची कामे तातडीने पूर्ण करावीत. तांत्रिक अडचणींमुळे ज्या शेतक-यांना ‘नमो शेतकरी’ योजनेचा लाभ मिळू शकला नाही, अशा शेतक-यांचा शोध घेऊन त्यांना लाभ मिळवून द्यावा. बनावट बँक खाती सत्यापित करावी. बँकांनी मत्स्य व्यवसायासाठी किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून द्यावे. शेतात पिके उभी असताना शेतकरी शेतात विजेचे प्रवाह असलेले कुंपण लावतो ही गंभीर बाब आहे. यासाठी ज्या ठिकाणी जंगली जनावरांचा हैदोस आहे, अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी झटका मशीनचा वापर करावा. तसेच जनावरे जी पिके खात नाही अशा पिकांची लागवड करावी.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात मामा तलाव, गोसेखुर्द व इतर तलावांमुळे पाण्याची उपलब्धता अधिक आहे. करडई, जवस, सूर्यफूल, मोहरी, चिया सीड्स या पिकांना बाजारभाव चांगला आहे. अशा पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल. आत्मा विभागामार्फत अनेक कामे करता येईल. त्यासाठी निधीदेखील उपलब्ध करून देता येईल.
जिल्ह्यातील विविध प्रकल्प व योजनांचा आढावा :
जिल्ह्यातील विविध प्रकल्प व योजनांचा आढावा घेताना पालक सचिव अनुप कुमार म्हणाले, जलजीवन मिशनचे प्रलंबित प्रकरणे तातडीने मंजुरीसाठी पाठवावी. शाळेतील नळ जोडणीची प्रकरणे प्राधान्याने हाताळावी. महात्मा फुले जनआरोग्य योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून द्यावे. एसएनडीटी विद्यापीठामार्फत महिलांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स होणे चांगली बाब असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडत आहे. यासाठी देशभरातून येणाऱ्या खेळाडूंना चांगल्या दर्जाची निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
तृणधान्य पिकांच्या जनजागृती संदर्भात प्रगतशील शेतकरी व फार्मर प्रोड्यूसर कंपनीना सहभागी करून घ्यावे. जिल्ह्यामध्ये पोल्ट्री इंडस्ट्रीजचा विकास होणे गरजेचे आहे, यासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्यावी. तसेच सदर काम तातडीने पूर्णत्वास नेऊन निधी मागणीचे प्रस्ताव असल्यास तातडीने पाठवावेत. बॉटनिकल गार्डन हा जिल्ह्याचा सुंदर व महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचेही ते यावेळी आवर्जून म्हणाले.
रानडुकर तसेच जंगली जनावरांमार्फत मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे, याचे पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत आहे का? याबाबत त्यांनी विचारणा केली. शेतकऱ्यांचा उत्पादित माल विक्रीसाठी ऑनलाईन मार्केटिंग विकसीत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील प्रकल्पांची व योजनांची संक्षिप्त माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
००००००
No comments:
Post a Comment