ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
Ø श्री. मुनगंटीवार यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे केला होता पाठपुरावा
चंद्रपूर, दि. ३१ : लाखो गुरूदेव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.
अमरावती येथील गुरूकुंज आश्रम जगाच्या कानाकोपऱ्यातील गुरूदेव भक्तांसाठी महत्त्वाचे स्थान आहे. थोर विभूती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची येथे समाधी आहे. राष्ट्रसंतांनी राष्ट्रभक्ती, जागृती, अंधश्रद्धा-जातीभेद निर्मूलन, ग्रामविकास यासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्याद्वारे लिखित ग्रामगिता अनेकांना जीवन कसे जगावे यासाठी प्रेरणा देते. मध्यप्रदेश व महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून गौरविले आहे. १९३५ मध्ये गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंतांनी आश्रम स्थापन केले. हा केवळ आश्रम नसून गुरूदेव भक्तांसाठी ऊर्जास्रोत आहे, असे श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते.
राष्ट्रसंतांच्या या कार्याला ‘अ’वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने २८ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महासमाधी स्थळ श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे. शासनाला यासंदर्भात विशेष बाब म्हणून तीर्थक्षेत्राला 'अ' दर्जा मिळवून दिल्याबद्दल गुरूकुंज आश्रम व गुरूभक्तांकडून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त होत आहेत.
गुरूदेव भक्तांमध्ये आनंद
यापूर्वी राष्ट्रसंतांचे नाव नागपूर विद्यापीठाला देण्यासाठी माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी विविध संसदीय आयुधांचा वापर करत सातत्यपूर्ण प्रयत्न विधिमंडळात आणि बाहेरही उभारत मोठी लढाई यशस्वी केली होती. हे सर्व गुरुदेव भक्तांच्या स्मरणात आहेत आणि आता गुरुकुंज आश्रमाला 'अ' तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने जगभरातील गुरुदेव भक्तामध्ये आनंद व्यक्त होत आहे.
श्री. मुनगंटीवार यांचा पाठपुरावा
गुरुकुंज आश्रमाला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्राच्या दर्जा मिळावा म्हणून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासून पाठपुरावा केला. ऑगस्ट 2023 पासून त्यांनी यासाठी ग्रामविकास विभागाकडे पत्रव्यवहार गेला. त्यांच्या पत्रव्यवहारानंतर ग्रामविकास विभागाने प्रधान सचिवांना या संदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 'अ' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाला प्रस्ताव सादर केला.
अंतिम मंजुरीसाठी पत्र
अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव शासनाला सादर केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामविकास विभागाचे या संदर्भात लक्ष वेधले. त्यानुसार 28 डिसेंबर 2023 रोजी ग्रामविकास विभागाने गुरुकुंज आश्रमाला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान केला.
०००००००
No comments:
Post a Comment