Search This Blog

Tuesday 12 December 2023

पाणी वापर संस्थेच्या प्रतिनिधींशी लाभक्षेत्र विकासाचे सचिवांचा संवाद

 




पाणी वापर संस्थेच्या प्रतिनिधींशी लाभक्षेत्र विकासाचे सचिवांचा संवाद

Ø गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट

चंद्रपूर, दि. 12 : मुंबई येथील लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव डॉ.संजय बेलसरे यांनी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थांना भेट देऊन संवाद साधला. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजीव टाटू, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री. वेमुलकोंड, अधिक्षक अभियंता राजेश पाटील, अधिक्षक अभियंता संजय विश्वकर्मा, डॉ. गणेश बडे, गोसेखुर्द उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप हासे, धरण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढूमने तसेच विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.  

पाणी वापर संस्थांच्या चळवळीत विदर्भातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे. सुमारे अडीच लाख हेक्टर लाभक्षेत्र असलेल्या या प्रकल्पात 447 पाणी वापर संस्थांचा समावेश होतो. यापैकी अनेक पाणी  वापर संस्था सक्षम होऊन स्वतःच्या बळावर प्रगतिशील वाटचाल करत आहेत. उजव्या कलव्यवरील किसान पाणी वापर संस्था, मौशी हे त्यापैकीच एक उदाहरण आहे. यावेळी आठ पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

            या भेटीदरम्यान पाणी वापर संस्था आणि सुरू असलेली कामे यासंदर्भात डॉ.बेलसरे यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी पाणी वापर संस्थांचे सुरू असलेल्या कामाचे सादरीकरण करण्यात आले. ज्यामध्ये पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून झालेला पीकबदल, कृषी पूरक उद्योग आणि जोडधंदे, कृषी संलग्नित व्यापार, पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या, पाण्याचे नियोजन आणि  समन्यायी पाणी वाटप या विषयांचा समावेश होता.  

सादरीकरनानंतर श्री. बेलसरे यांनी समाधान व्यक्त केले. मार्गदर्शनात ते म्हणाले, पाणी वापर संस्थांच्या या चळवळीला शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत होईल. पाणी वापर संस्थांना लागणाऱ्या पाठबळाची पूर्तता विभागाकडून वेळोवेळी करण्यात येईल तसेच मदत, मार्गदर्शन आणि सक्षमीकरणासाठी एक त्रयस्त संस्था नक्कीच काम करेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी किसान पाणी वापर संस्था, मौशी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन डॉ. संजय बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आले.  

यावेळी पाणी वापर संस्थांना येणाऱ्या अडचणी आणि त्यासाठी हवी असणारी विभागाची साथ, यांची सांगड घातली तर नक्कीच विदर्भातील पाणी वापर संस्था महाराष्ट्रातील इतर पाणी वापर संस्थांशी बरोबरी करू शकतील, असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

00000

No comments:

Post a Comment