आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन
देणारा इस्त्रो शैक्षणिक दौरा
Ø एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा नाविण्यपूर्ण उपक्रम
चंद्रपूर, दि. 13 : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व भविष्यात आश्रमशाळेतून वैज्ञानिक निर्माण व्हावे या उद्देशाने, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर कार्यालयातंर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा इस्त्रो शैक्षणिक दौरा आयोजित करण्यात आला होता.
चंद्रपूर प्रकल्प कार्यालयातंर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील 16 विद्यार्थी व चिमूर प्रकल्प कार्यालयातंर्गत 3 असे एकूण 19 विद्यार्थी इस्त्रो शैक्षणिक दौऱ्यात सहभागी झाले होते. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या संकल्पनेतून या विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेण्याची संधी मिळाली.
शैक्षणिक दौऱ्यादरम्यान सहायक प्रकल्प अधिकारी श्री. बोंगिरवार तसेच एस. श्रीरामे, एम. डी. गिरडकर, एच.डी. पेदोंर आदी कर्मचारी विद्यार्थ्यांसमवेत होते.
सोमवार दि. 4 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत इस्त्रो सहलीचे आयोजन करण्यात आले होते. बेंगलोर येथील इस्त्रो केंद्राला भेट देवून सर्व विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी चंद्रयान-3 प्रक्षेपणाची संपूर्ण माहिती तसेच चंद्रयान प्रक्षेपणात वापरण्यात आलेल्या विविध साधनांची माहिती शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यासोबतच श्रीरंगपट्टनम येथील टिपू सुलतान पॅलेस, टिपू सुलतान समाधी, वृदांवन गार्डन, प्राणी संग्रहालय येथे भेट तसेच म्हैसूर शहरातील ऐतिहासिक व भौगोलिक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरीता नाविण्यपूर्ण उपक्रम मंजूर करुन इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेण्याची संधी तसेच या माध्यमातून एखादा शास्त्रज्ञ घडू शकतो हा या सहलीमागचा उद्देश असल्याचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment