आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पाहोचवा
-सीईओ विवेक जॉन्सन
Ø राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा
चंद्रपूर : राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित व सामान्यांसाठी विविध आरोग्य योजना सुरू आहेत. या आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बैठकीत दिल्या.
जिल्हा परीषदेतील सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचा त्रैमासिक आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
बैठकीला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा महीला व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, डॉ. श्रीकांत जोशी, जिल्हा आयसीटीसीचे पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, नसीमा शेख अनवर, देवेंद्र लांजे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा घेतला.
तसेच जिल्ह्यातील अतिजोखिम गटात असणाऱ्या समुदायातील प्रत्येकाला सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अशासकीय संस्थांची मदत घेऊन त्यादिशेने कार्य करण्याच्या सूचना दिल्या.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सादर करतांना जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयपर्यंत एचआयव्ही समुपदेशन व चाचणी सुविधा मोफत पुरविण्यात येत असल्याची माहिती दिली. गतवर्षी 2022-23 मध्ये जिल्हयात सामान्य 1 लक्ष 5 हजार 494 एचआयव्ही चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 324 सामान्य संक्रमित आढळले. त्यांना उपचारावर घेण्यात आले. तसेच 50 हजार 211 गरोदर मातांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 43 माता संक्रमित आढळून आल्या.
माहे, एप्रिल ते सप्टेंबर 2023 पर्यंत 39 हजार 371 सामान्य एचआयव्ही तपासण्या करण्यात आल्या. त्यात सामान्य संक्रमित 152 आढळले. तसेच 23 हजार 829 गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली यामध्ये 19 माता संक्रमित आढळल्या. जिल्हा कारागृहात केलेल्या तपासणीमध्ये 2 एचआयव्ही बाधित आढळले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अतिजोखीम गटात असणाऱ्या टीजी, एमएसएम, एफएसडब्ल्यु यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा समुदाय संसाधन समूह स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
आढावा बैठकीला संबोधन ट्रस्टचे राज काचोळे, लिंकवर्कर प्रकल्पाचे रोशन आकुलवार, ट्रकर्स प्रकल्प नोबल शिक्षण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अनिल उईके, जनहिताय मंडळ मायग्रंट प्रकल्पाचे बिरेंद्र कैथल, विहान प्रकल्पाच्या संगिता देवाळकर, विद्या धोबे आदी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment