राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा
Ø विसापूर तालुका क्रीडा संकुल येथे भेट व व्यवस्थेची पाहणी
चंद्रपूर, दि. 23 : बल्लारपूर (विसापूर) तालुका क्रीडा संकूल येथे होणा-या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.23) घेतला. विसापूर येथील क्रीडा संकुलाला भेट देऊन त्यांनी व्यवस्थेची पाहणी केली व संबंधितांना सुचना दिल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, मनपा आयुक्त विपील पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, उपविभागीय अधिकारी स्नेहल राहाटे, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, हरीश शर्मा, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. सर्व समित्यांनी एकमेकांत समन्वय ठेवावा. तसेच शासकीय, अशासकीय सदस्य आणि स्वयंसेवकांनी चर्चा करून सुक्ष्म नियोजन करावे. जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी, क्रीडा संघटना, त्यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या स्पर्धेच्या यशस्वीकरीता दिवसरात्र काम करीत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रपूर, बल्लारपूरचे नाव देशपातळीवर पोहचून जिल्ह्याचा नावलौकिक होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने या स्पर्धेकरीता उत्स्फुर्तपणे आपले योगदान द्यावे. बाहेरून येणा-या खेळाडूंना निवास, वाहतूक, भोजन आदी व्यवस्थेसंदर्भात माहिती उपलब्ध करून द्यावी. खेळाडूंना काही अडचणी आल्या तर त्याचे निराकरण करण्यासाठी मदत कक्ष, संपर्क क्रमांक, चॅटबॉट आदी व्यवस्था सज्ज ठेवाव्यात. खेळाडूंना घेऊन येणा-या प्रतिनिधींसोबत समित्यांनी समन्वय ठेवून त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिका-यांनी संपूर्ण टीमसह, नोंदणी कक्ष, स्वागत कक्ष, भोजन व्यवस्था कक्ष, पार्किंगची व्यवस्था, क्रीडा मैदान, सांडपाणी व्यवस्था आदींची पाहणी केली.
०००००००
No comments:
Post a Comment