दिव्यांग व्यक्तींकरिता फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचा लाभ घेण्यासाठी 4 जानेवारीपुर्वी करा अर्ज
चंद्रपूर दि.25 : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य दिव्यांग
वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून हरीत उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही
फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) उपलब्ध करून देण्यात येणार
आहे. यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in/
या संकेतस्थळावर 4 जानेवारी 2024
सकाळी 10 वाजेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन
महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना
पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करून कुटूंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे
असा आहे.
योजनेच्या अटी व शर्तीनुसार अर्जदार हा 18 ते 55 वयोगटातील महाराष्ट्र राज्याचा रहीवासी
असावा, दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40 टक्के असावे व तसे जिल्हा शल्य चिकित्सक अथवा सक्षम प्राधिकारी यांनी
प्रमाणित केले असावे. अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे युडीआयडी प्रमाणपत्र असणे
बंधनकारक आहे. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास
सक्षम असतील. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाख 50 हजार पेक्षा अधिक नसावे. लाभार्थी निवड
करतांना जास्त दिव्यांगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. अतितीव्र
दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास
अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत
सोबत्याच्या सहाय्याने फिरत्या वाहनावरील व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे
बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील. अर्जदार
शासकीय, निमशासकीय, मंडळे अथवा महामंडळाचा कर्मचारी नसावा. तसेच दिव्यांग वित्त व विकास
महामंडळाच्या कर्जाचा थकबाकीदार नसावा. राज्यातील इतर कोणत्याही योजनेंतर्गत मोफत
ई-वाहन प्राप्त झालेले दिव्यांग लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. अधिक
माहितीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील दिव्यांग वित्त व
विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करावा.
0000
No comments:
Post a Comment