क्रीडा स्पर्धेनिमित्त आयोजित बाईक रॅलीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
चंद्रपूर दि.25 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत आहे. या निमित्ताने जिल्ह्यात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून खेळाडू येण्यास सुरवात झाली आहे. या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच क्रीडा स्पर्धेचा ज्वर वाढवून वातावरण निर्मितीकरीता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेवरून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज (दि.25) चंद्रपूर व बल्लारपूर या शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत नागरिकांनी स्वत:हून मोठ्या प्रमाणात सहभागी होत उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.
बाईक रॅलीला सुरवात होण्यापूर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, दिनांक 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत बल्लारपुर क्रीडा संकुलात होणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या क्रीडा स्पर्धेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून चंद्रपूरचा नावलौकीक देशभरात होण्यासाठी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सदर रॅलीला जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरूवात करण्यात आली. ही रॅली पुढे वरोरा नाका, प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेट, माता महाकाली मंदिर, बल्लारपूर शहर, ब्राह्मणी फाटा या मार्गाने विसापूरपर्यंत पोहचली. तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी उपस्थितांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर येथील क्रीडा संकूलात असलेल्या वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
रॅलीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे तसेच विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
००००००
No comments:
Post a Comment