पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ‘महाजनसंपर्क’ ठरला नागरीकांसाठी मोलाचा
Ø संपूर्ण जिल्ह्यात उपक्रम राबविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
चंद्रपूर, दि. 3 : नागरीकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण व्हावे व त्यांना वेगवेगळ्या कार्यालयांच्या सातत्याने फेऱ्या मारण्याचे काम पडू नये, यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेले ‘महाजनसंपर्क’ अभियान चंद्रपूर करांसाठी मोलाचा ठरला.
चंद्रपूर येथील नियोजन भवनात शुक्रवारी श्री. मुनगंटीवार यांनी नागरीकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी नागरीक वेगवेगळ्या सरकारी विभागातील कार्यालयांच्या फेऱ्या मारत असतात. परंतु अनेकदा त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेता श्री. मुनगंटीवार यांनी स्वत: पुढाकार घेत ‘महाजनसंपर्क’ घेतला.
या महाजनसंपर्क कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., महापालिका आयुक्त विपीन पालीवाल, राहुल पावडे, देवराव भोंगळे, संध्या गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्हाभरातील नागरीक उपस्थित होते.
यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सर्वांनीच जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. ‘महाजनसंपर्क’ हा त्यासाठी महत्वाचा दुवा ठरू शकतो. केवळ एकदा ‘महाजनसंपर्क’ घेऊन थांबणे योग्य होणार नाही. संपूर्ण जिल्ह्यात अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदार संघात आगामी काळात ‘महाजनसंपर्क’ घेण्यात यावे, अश्या सूचना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.
आपण सुरुवातीपासूनच जनतेच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. पालकमंत्री या नात्याने तर जिल्ह्याचे पालकत्वाची जबाबदारी आपल्याकडे आहे. अशात लोकांना अडीअडचणींचा सामना करीत प्रशासनापर्यंत पोहोचण्याची कसरत करायला लावण्यापेक्षा प्रशासनाला त्यांच्यापर्यंत कसे पोहोचविता येईल, हाच प्रयत्न आपला राहणार आहे. त्यामुळे सर्व विभागातील अधिकाऱ्यांनीही याच दृष्टीने नियोजन करीत पावले टाकावी, असे निर्देश ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत.
०००००००
No comments:
Post a Comment