जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दिव्यांग प्रवर्गातील मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन
Ø दिव्यांगाच्या संख्यात्मक सर्व्हेक्षणाबाबत “दृष्टी चंद्रपूर ॲप पोर्टल”चे लोकार्पण
चंद्रपूर, दि. 03: जागतिक दिव्यांग दिनानिमित्त (दि.3डिसेंबर) जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत, जिल्ह्यातील दिव्यांग प्रवर्गातील शाळा, कार्यशाळेतील मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी विनय गौडा व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अतुलकुमार गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संग्राम शिंदे, सहाय्यक सल्लागार कैलास उईके, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन कन्नाके, सहाय्यक लेखा अधिकारी अमोल चिटमलवार, समाज कल्याण निरिक्षक निलोफर अली तसेच सर्व दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविकेत बोलतांना जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम म्हणाले, समाजकल्याण विभागातंर्गत चालविल्या जाणाऱ्या दिव्यांग शाळेतील दिव्यांग क्रीडा स्पर्धेत जिल्हयातील अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग व मतिमंद प्रवर्गाच्या अनुदानित 12 व विना अनुदानित 7 दिव्यांग शाळा व कार्यशाळा कार्यरत आहेत. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये 25, 50, 100 आणि 200 मिटर धावणे, गोळाफेक, लांब उडी, उंचउडी व बुध्दीबळ या खेळप्रकारानुसार स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग बांधवासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांबाबत त्यांनी माहिती दिली. त्यासोबतच शासकीय योजना, जिल्हा परिषदेचा स्वनिधीतून तसेच 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीतून दिव्यांगाना विविध प्रकारचे लाभ देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हयातील सर्व दिव्यांगाची नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते दिव्यांगाच्या संख्यात्मक सर्व्हेक्षणाबाबत “दृष्टी चंद्रपूर ॲप” पोर्टलचे संगणकाद्वारे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी चंद्रपूर जिल्हा हा संपुर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांगासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नावारूपास आला असल्याचे सांगितले. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम व त्यांच्या सहकारी कर्मचा-यांचे कौतुक केले.
दिव्यांग क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील विविध प्रवर्गाच्या अनुदानित 12 व विनाअनुदानित 7 दिव्यांग शाळेतील सर्व दिव्यांग प्रवर्गातील एकूण 271 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी आनंद अंध विद्यालय,आनंदवन येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. या कार्यक्रमाचे संचालन रविंद्र नलगंटीवार यांनी केले.
तत्पुर्वी, अंध लिपीचे जनक लुईस ब्रेल व हेलन केलर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करुन तसेच मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेला सुरवात करण्यात आली.
दिव्यांगाच्या संख्यात्मक सर्व्हेक्षणाबाबत दृष्टी चंद्रपूर ॲप पोर्टलचे लोकार्पण:
जिल्हयातील सर्व दिव्यांगाची नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते दिव्यांगाच्या संख्यात्मक सर्व्हेक्षणाबाबत “दृष्टी चंद्रपूर ॲप पोर्टल”चे संगणकाद्वारे लोकार्पण करण्यात आले.
००००००
No comments:
Post a Comment