Search This Blog

Saturday 30 December 2023

वनरक्षक पद भरती विद्यार्थ्यांच्या हिताकरीता वनविभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार


वनरक्षक पद भरती 

विद्यार्थ्यांच्या हिताकरीता वनविभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार

Ø वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय

चंद्रपूर, दि. 30 : पेसा कायद्यांतर्गत येणा-या गावातील वनरक्षक पदे सोडून इतर पदे तात्काळ भरण्यासाठी राज्याचा वन विभाग राज्य सरकारमार्फत  सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे. हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळावा या दृष्टीने वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांच्याशी चर्चा करून सदर भरती प्रक्रियेचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या हिताकरीता राज्य सरकार, वन विभाग आणि मी स्वतः संवेदनशील असून त्यांना दिलासा मिळावा, असा आमचा उद्देश आहे. त्यामुळे या विद्यार्थांचे हित प्राधान्यक्रमावर आहे, म्हणूनच हा निर्णय घेत असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष वकील नियुक्त करण्याची कार्यवाही करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

हजारो उमेदवारांनी वनरक्षक या पदाची परिक्षा दिली असून केवळ पेसा क्षेत्राच्या अधिसुचनेसंदर्भात संपूर्ण निकाल जाहीर न होऊ शकल्याने अनेक उमेदवार निकालाची वाट बघत आहेत. ही बाब वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हा विषय गांभिर्याने घेऊन वनविभागाला सुचना केल्या. पेसा क्षेत्र वगळता वनरक्षकाची इतर पदे भरण्यासाठी वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यालयालयाला याबाबत विनंती करणार आहे. यासाठी विशेष वकील नेमण्यात येईल.  जेणेकरून इतर क्षेत्रातील वनरक्षक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या नोकरीचा मार्ग सुकर होईल.

वन विभागातील लघुलेखक (उच्चश्रेणी )(गट ब) (अराजपत्रित), लघुलेखक (निम्मश्रेणी )(गट ब) (अराजपत्रित), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब) (अराजपत्रित), वरिष्ठ सांख्यिकी सहायक (गट क) कनिष्ठ सांख्यिकी सहायक (गट क) या राज्यस्तरीय संवर्गाची व लेखापाल (गट क), सर्व्हेक्षक (गट क) व वनरक्षक (गट क) या पदांच्या भरतीसाठी दिनांक 8 जून 2023 रोजी जाहिरात देण्यात आली होती. वरील जाहिरातीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात 5.5 लक्ष अर्ज प्राप्त झाले. वनविभागाची भरती प्रक्रिया ही टी.सी.एस.आय.ओ.एन या कंपनीमार्फत राबविण्यात आली असून त्यांच्याकडून उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा ही राज्याच्या विविध 129 केंद्रावर दि. 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात आली. यापरिक्षेकरीता 86.49 टक्के उमेदवार उपस्थित होते.

भरती प्रक्रियेचे पुढील टप्पे जसे ॲन्सर की देणे व त्यावर आक्षेप मागविणे, आक्षेपांचे निवारण करणे, अंतिम ॲन्सर की देणे ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली. तसेच वनरक्षक वगळता ऑनलाईन परिक्षेचा निकाल 22 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. मात्र राज्यपाल यांच्या 29 ऑगस्ट 2019 अन्वये पेसा क्षेत्रातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीसाठी अधिसुचित करण्यात आली आहे. या अधिसुचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून या प्रकरणी पुढील कार्यवाही न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या सुचना आहेत. त्यामुळे वनरक्षक पदाचा निकाल जाहीर करण्यात आला नाही.

००००००

No comments:

Post a Comment