Search This Blog

Sunday 24 December 2023

हरवलेल्या बालकाला मिळाले पालक

 हरवलेल्या बालकाला मिळाले पालक

Ø महिला व बाल विकास कार्यालयाच्या प्रयत्नाला यश

 चंद्रपूर दि.24 : रेल्वे स्टेशन पडोली येथे रेल्वे पोलीस दलाला 20 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या बालकाला रेल्वे पोलीस दल, चाईल्ड हेल्प लाईन व महिला व बाल विकास कार्यालयाच्या प्रयत्नातून त्याचे पालकांचा शोध घेवून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात यश मिळाले आहे.

आंध्र प्रदेश येथील बालक दिनांक 20 ऑक्टोबर रोजी विवेकानंद नगर रेल्वे स्टेशन पडोली येथे रेल्वे पोलीस दल यांना मिळाला होता. रेल्वे पोलीस दलाने चाईल्ड हेल्प लाईनला सदर बालकाची माहिती दिल्यानंतर  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड हेल्पलाईनच्या चमूने विवेकानंद नगर रेल्वे स्टेशन पडोली येथे भेट दिली व बालकाची संपूर्ण माहिती घेवून माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व बाल कल्याण समितीला दिली, व समितीच्या आदेशाने बालकाला शासकीय बालगृह येथे ठेवण्यात आले.

यानंतर बालकाच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला व त्यांना दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी बाल कल्याण समिती समोर बोलविण्यात येवून समितीमार्फत सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येवून बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, बालकल्याण समिती अध्यक्ष क्षमा बासरकर व सदस्य ज्योत्स्ना मोहितकर, अमृता वाघ व वनिता घुमे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, तसेच चाईल्ड हेल्प लाईनचे अभिषेक मोहूर्ले, रोहित मोहूर्ले आदींनी बालकाला पालक मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी हरवलेली, असहाय तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली बालके आढळल्यास चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोलफ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

0000

No comments:

Post a Comment