Search This Blog

Thursday 7 December 2023

देशाच्या प्रगतीत व संरक्षणात सैनिकांचे अमुल्य योगदान -जिल्हाधिकारी विनय गौडा

                               







 देशाच्या प्रगतीत व संरक्षणात सैनिकांचे अमुल्य योगदान

-जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

चंद्रपूर, दि. 7 : देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्यास आपला देश आणि नागरिक सुरक्षित राहू शकतात. सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळेच आपला देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे. देशाच्या प्रगतीत व संरक्षणात सैनिकांचे अमुल्य योगदान असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. नियोजन भवन सभागृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार प्रामुख्याने उपस्थित होते.

आंतरसुरक्षा व बाह्यसुरक्षेशिवाय कोणताही देश प्रगती करु शकत नाही, सीमेचे रक्षण करणा-या सैनिकांमुळेच आपला देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री.गौडा म्हणाले, 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यात तिन्ही सशस्त्र दलाचे बलिदान अमुल्य आहे. शहीद सैनिक व माजी सैनिकांच्या परीवाराच्या कल्याणासाठी दरवर्षी सशस्त्र ध्वजदिन निधी संकलीत केला जातो. ध्वजदिन निधी संकलन करणे हे सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छोटेसे पाऊल आहे. या माध्यमातून माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियांच्या कल्याणासाठी मदत होणार आहे. मागील वर्षी 132 टक्के निधीचे संकलन झाले असून यावर्षी देखील दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त ध्वजनिधी संकलीत केला जाईल, असे त्यांनी आश्वस्त केले.

पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी म्हणाले, जवान देशाच्या सीमेवर तैनात असल्याने नागरीक सुरक्षित असून देशाच्या सिमा भक्कम आहेत. विद्यार्थी दशेपासूनच ध्वजनिधी संकलन केल्या जात आहे. या ध्वजनिधीतून माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियासाठी कल्याणकारी व उपयोगी कामे, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे आदी कामे ध्वजनिधी संकलनातून केल्या जातात. सैनिक हे प्रेरणास्त्रोत असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही प्रशासन सदैव त्यांच्या पाठीशी राहील असेही ते म्हणाले.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार म्हणाले, कुटूंबापासून दूर राहून प्रतिकुल परिस्थितीतही देशाची सुरक्षा करण्याची महत्वाची जबाबदारी सैनिक अहोरात्र करीत असतात. सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कोणत्याही समस्या असतील तर त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द असल्याचे श्री.पवार म्हणाले.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी प्रास्ताविकेतून बोलतांना म्हणाले, सैनिक कुटूंब व आप्तेष्टांपासून दूर राहून विषम व भौगोलिक परीस्थितीत देशाच्या सीमेचे प्राणपणाने रक्षण करीत असतो. त्यामुळेच आपण आपल्या जीवनाचा निंवात व निश्चिंतपणे आस्वाद घेऊ शकतो. या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. युद्ध असो वा नसो देशातंर्गत होणाऱ्या अतिरेकी कारवायांवर सुद्धा त्यांना नजर ठेवावी लागते. तसेच पुरजन्य, दुष्काळ परिस्थितीत सुद्धा या सैनिकांची मदत घेतली जाते असेही ते म्हणाले. या निधीतून युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या वारसांना आर्थिक मदत करणे, शहीद व सेवारत सैनिकांच्या परिवारांना मदत, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे, माजी सैनिकांच्या कुटूंबियांना चरितार्थ चालविण्यासाठी मदत या निधीतून करण्यात येत असल्याची माहिती कॅप्टन लिमसे यांनी दिली.

वीरपत्नी/वीरमाता/ वीरपिता/ शौर्यपदक धारकांचा सत्कार:

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीरपत्नी वेंकम्मा गोपाल भिमनपल्लीवार व त्यांची विधवा मुलगी सरोजा हनमलवार, अरुणा सुनिल रामटेके, वीरमाता शिला सुदाम कोरे, पार्वती डाहुले, छाया बालकृष्ण नवले, वीरपिता वसंतराव डाहुले, बालकृष्ण नवले तसेच शौर्यचक्राने सन्मानित माजी नायब सुबेदार शंकर मेंगरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मागील वर्षीच्या ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय आस्थापनांचा देखील याप्रसंगी भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार देवानंद काळबांडे यांनी मानले. कार्यक्रमाला माजी सैनिक बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष हरिष गाडे, पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोबाटे, जयहिंद माजी सैनिक संघटनेचे विजय तेलरंगे तसेच जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरमाता, वीरपीता, वीरनारी व विविध कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment