Search This Blog

Monday 30 September 2024

चंद्रपूर येथे उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता

 



चंद्रपूर येथे उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता

मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय; ना.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश

ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणार भाजीपाला संशोधन केंद्र

चंद्रपूर, दि. 30 : चंद्रपूर जिल्ह्यातील एकार्जुना येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषि  विद्यापीठ अकोला अंतर्गत भाजीपाला संशोधन केंद्र स्थापन करण्यास आज दिनांक 30 सप्टेंबर 2024 च्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता दिली. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून भाजीपाला संशोधन केंद्र बांधण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

याअंतर्गत भाजीपाला पिकात अनुवंश शास्त्राचा अभ्यास करून सुधारित संकरीत वाण विकसित करणे व गुणवत्तापूर्वक उत्पादनास चालना देणे, भाजीपाला पिकांच्या देशी वणांचे संवर्धन करणे, दुर्मिळ अशा रान भाज्यांची संवर्धन व लागवड करणे, भाजीपाला पिकांचे दर्जेदार उत्पादनासाठी शेडनेट हाऊस, आधुनिक रोपवाटिका तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक्स एरोपोनिक्स तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, फर्टिगेशन इत्यादी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणे, भाजीपाला पिकांचे बिजोत्पादन तंत्रज्ञान विकसित करणे, संरक्षित भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान विकसित करुन उत्पादन वाढविणे, भाजीपाला पिकांवर येणाऱ्या किडी व रोगांचा अभ्यास करून त्यावर नियंत्रणाचे प्रभावी उपाय शोधणे, भाजीपाला पिकांची प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि साठवणूक, प्रक्रिया उदयोगास चालना देणे, भाजीपाला पिकांच्या सुधारित लागवड तंत्रज्ञाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे ही या उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्राची उद्दिष्ट्ये असल्याचे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले..

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मागील दोन दशकांमध्ये भाजीपाला  उत्पादनात मोठी वाढ  झाली आहे. तथापि, वातावरणात होणारे बदल व त्यामुळे उद्भवणारे खोड किडीच्या समस्या, कमी टिकवण क्षमता, बदलत्या वातावरणात अनुकूल तंत्रज्ञानाचा अभाव आदी बाबींचा सामना करावा लागत आहे.  विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने मिरची, हळद, वांगी, टोमॅटो, कांदा, फुलकोबी, पत्ताकोबी, मुळा इत्यादी भाजीपाल्याचे पिके घेतली जातात. भाजीपाला  पिकांच्या लागवडीसाठी उपयुक्त जमीन,  मुबलक पाणी व मजुंराची उपलब्धता इत्यादी असल्याने या जिल्ह्यात भाजीपाला लागवडीस मोठा वाव आहे.  सद्यस्थितीत चंद्रपूर जिल्ह्याच्या एकार्जुना येथे कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे. मात्र, दिवसेंदिवस भाजीपाला पिकांची वाढती मागणी, चांगला बाजारभाव व प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यासाठी असलेल्या संधी आदी बाबी पाहता भाजीपाला पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होण्यासाठी उच्च तंत्रज्ञान युक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभारणे आवश्यक होते असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देणे, गुणवत्तापूर्ण बिजोत्पादन, काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन करण्यासाठी या संशोधन केंद्र स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. या संशोधन केंद्रासाठी 10 पदे  निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

००००००

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे उर्वरित 58.94 कोटी रुपये

 

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे उर्वरित 58.94 कोटी रुपये

मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी; 31 हजार 968 शेतकऱ्यांना दिलासा

मंत्री मुनगंटीवार यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेऊन मांडला होता मुद्दा

चंद्रपूर,दि.30- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना पिकविम्याची उर्वरित रक्कम मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 31 हजार 968 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत पिकविम्याची उर्वरित रक्कम तातडीने देण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 31 हजार 968 शेतकऱ्यांना उर्वरित 58.94 कोटी रुपये मिळणार आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 ची उर्वरित रक्कम मिळण्यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार सातत्याने पाठपुरावा करीत होते. राज्यशासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन चंद्रपूर येथे दोन बैठका तर मुंबई येथे कृषीमंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला होता. त्यानंतर 143.81 कोटी रुपये पिक विमा रकमेचे वाटप झाले. पण 31 हजार 968 शेतकऱ्यांचे 58.94 कोटी रुपये प्रलंबित होते.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थिती सांगितली. शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळाली तरच शेतीचे पुढचे नियोजन करणे शक्य होईल. शिवाय सणासुदीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना आधार होईल, अशी भावना श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली होती. 

ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीला विमा हफ्त्याचा राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा मिळालेला नाही. त्यामुळे जिल्हयातील उर्वरीत शेतकऱ्यांची पिक विमा नुकसान भरपाई प्रलंबित असल्याचे विमा कंपनीमार्फत कळविण्यात आले आहे. ही बाब देखील पालकमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम लवकरच मिळण्याचा मार्ग त्यामुळे मार्ग सुकर झाला होता. पण उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नव्हती.

सोमवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात आवर्जून चर्चा झाली. मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हा विषय पुन्हा एकदा लावून धरला. अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे तातडीने देण्यास मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे मानले आभार

पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला होता. त्यानंतर पिक विम्याच्या रकमेसाठी आणि आता उर्वरित रकमेसाठी देखील ना. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्येकवेळी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असलेल्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

००००००

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज पोंभुर्णा येथे आदिवासी मेळावा

 राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज पोंभुर्णा येथे आदिवासी मेळावा

चंद्रपूर,दि.30 : शासकीय विभागांमार्फत जिल्ह्यात राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती नागरिकांना होण्याच्या दृष्टीने 1 ऑक्टोबर 2024 रोजी पोंभुर्णा येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार राहतील.

पोंभुर्णा – मुल रोडवर असलेल्या तालुका क्रीडा संकूल, पोंभुर्णा येथे 1 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2.30 वाजता आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच सदर कार्यक्रमात आदिवासी बांधवांकरीता योजनांचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामेदव किरसान, प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, कीर्तिकुमार भांगडीया, सुभाष धोटे, किशोर जोरगेवार, पोंभुर्णाच्या नगराध्यक्षा सुलभा पिपरे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आदी उपस्थित राहणार असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

००००००

आदिवासी मेळाव्यानिमित्त पोंभुर्णा येथील वाहतूक व्यवस्थेत बदल

 

आदिवासी मेळाव्यानिमित्त पोंभुर्णा येथील वाहतूक व्यवस्थेत बदल

चंद्रपूर,दि.30 : दि. 1 ऑक्टोबर रोजी पोंभुर्णा येथे आदिवासी मेळाव्यासाठी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपस्थित राहणार असल्यामुळे सदर मेळाव्याला मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित राहणार आहेत. दौरा कार्यक्रम असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला नाहक त्रास होऊ नये म्हणून पोंभुर्णा येथील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत गोपाल नगर टी पॉईंट ते पोंभुर्णा व देवाळा गाव ते पोंभुर्णा पर्यंत जड वाहतूक बंद राहील. तसेच आवश्यकतेनुसार सदर कालावधीत ठराविक वेळेकरीता सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येईल. या कालावधीत जड वाहतूकदार व इतर वाहतुकदारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

1. चंद्रपूरकडून पोंभुर्णा किंवा गोंडपिपरीकडे जाण्याकरीता गोपाल नगर टी पॉईंट- बोडा गाव- उमरी टी पॉईंट – बोर्डा (बोरकर) टी पॉईंट- बोर्डा दीक्षित- बोर्डा फाटा- नवीन गंगापूर- कसरगटा- पोंभुर्णा या रस्त्याचा अवलंब करावा. 2. पोंभुर्णाकडून चंद्रपूरकडे जाण्याकरीता करसगटा – नवीन गंगापूर – बोर्डा फाटा – बोर्डा दीक्षित – बोर्डा (बोरकर) टी पॉईंट – उमरी टी पॉईंट – बोर्डा गाव – गोपाल नगर टी पॉईंट ते चंद्रपूर या मार्गाचा अवलंब करावा. 3. मुल कडून पोंभुर्णा किंवा गोंडपिपरी जाण्याकरीता देवाळा – थेरगाव – सेलूर नागरेडी – वेळवा गाव – पोंभुर्णा या मार्गाचा वापर करावा. 4. तसेच पोंभुर्णाकडून मूलकडे जाण्याकरीता वेळवा गाव – सेलूर नागरेडी – थेरगाव – देवाळा – मूल या मार्गाचा वापर करावा.

सदर आदेशाचे पालन करून सर्व वाहतुकदारांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

००००००

होमगार्ड प्रतिक्षा यादी संकेतस्थळावर उपलब्ध

 होमगार्ड प्रतिक्षा यादी संकेतस्थळावर उपलब्ध

चंद्रपूर,दि.30 : चंद्रपूर जिल्हा होमगार्ड अंतर्गत नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी निवड प्रक्रिया (भरती) 22 ते 24 ऑगस्ट 2024 या कालावधीत घेण्यात आली होती. सदर निवड प्रक्रियेची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login.php या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. सदर प्रतिक्षा यादी 31 मार्च 2025 पर्यंत राहील, त्यानंतर प्रतिक्षा यादी संपुष्ठात येईल, असे अपर पोलिस अधिक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड रिना जनबंधू यांनी कळविले आहे.

००००००

Sunday 29 September 2024

देशसेवेतून भारत मातेचा सन्मान वाढवा!

                           






                    देशसेवेतून भारत मातेचा सन्मान वाढवा!

 

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा भावी सैनिकांना संवाद

Ø सैनिक स्कूल येथे राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे आयोजन

चंद्रपूर,दि.29 : सैनिक स्कूलमध्ये शिकताना लोक काय म्हणतात’ याचा कधीही विचार करू नका. आपल्याला काय करायचे आहेहे लक्षात घेत आपण आपले ध्येय निश्चित करायला हवे. तुमचे हस्ताक्षर ऑटोग्राफमध्ये जेव्हा बदलतीलतेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनाचे आकलन आणि मूल्यांकन करता येईल. तुम्ही भारत मातेसाठीभारत मातेच्या आनंदासाठी कार्य करा. या देशाची सेवा करून भारत मातेचा सन्मान आपण वाढविला पाहिजेअसा कानमंत्र वनेसांस्कृतिक कार्यमत्स्य व्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भावी सैनिकांना दिला आहे.

बल्लारपूर तालुक्यातील सैनिक स्कूल येथे राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी देशभरातील 42 सैनिकी शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांशी श्री. मुनगंटीवार यांनी संवाद साधला. शाळेचे मुख्याध्यापक कॅप्टन अश्विन अनुप देवउपमुख्याध्यापक लेफ्टनंट कर्नल संजय पटियालकार्यालयीन अधिकारी रजथ जी व्यासपीठावर उपस्थित होते.

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रसंगी पुरुषांपेक्षाही मोलाची कामगिरी बजावली आहे. राजमाता जिजाऊंपासून राणी लक्ष्मीबाईपर्यंतचा इतिहास आपल्याला हे दाखवून देतो. त्यामुळे सैनिक शाळेतही विद्यार्थिनींसाठी जागा असाव्या आपला आग्रह होता. परंतु अधिकाऱ्यांनी आपल्याला अशी कोणतीही तरतूद नसल्याचे सांगितले. नारीशक्ती कोणापेक्षा कमी नाहीहे ठाऊक होते. त्यामुळे आपण ही बाब योग्य नसल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. आपण नारीशक्तीला आदीशक्ती स्वरुपात पुजतोमानतो. त्यामुळे त्यांना स्थान मिळालेच पाहिजेअसा आग्रह केल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थिनींच्या विषयावर जेव्हा अधिकाऱ्यांसोबत ही चर्चा सुरू होतीत्यावेळी देशाच्या रक्षामंत्री निर्मला सीतारामण होत्या. आपण अधिकाऱ्यांना सांगितले कीजसे रक्षामंत्री म्हणून सीतारामण कमी पडणार नाहीअगदी त्याच पद्धतीने देशाच्या रक्षणात मुली कधीही कमी पडणार नाहीत. अधिकाऱ्यांना हा मुद्दा पटला. त्यानंतर देशात प्रथमच सैनिक शाळेत विद्यार्थिनींना दहा टक्के आरक्षण मिळाले. पहिल्यांदा हे आरक्षण मिळाले ते चंद्रपूरच्या सैनिक शाळेत. त्यानंतर देशातील इतर शाळांमध्ये ही पद्धत सुरू झाल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले. चंद्रपूरनंतर देशाच्या अन्य सैनिक शाळांसाठी शासन निर्णय काढण्यात आला.

सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये श्री. मुनगंटीवार यांनी राष्ट्रभक्तीचे स्फूरण भरले. तुमची सही जोपर्यंत ऑटोग्राफ’ बनणार नाहीतोपर्यंत शांत बसू नका. मातृ-पितृ आणि राष्ट्रभक्तीशिवाय कोणतीही भक्ती श्रेष्ठ नाही. राष्ट्रभक्ती करताना कार्य असे करा की तुमच्या आईवडिलांची मान अभिमानाने ताठ झाली पाहिजे. विद्यार्थी दशेपासूनच स्वत:ला असे घडवा की अख्ख्या देशाने तुमच्या कार्याला कडक सॅल्यूट केला पाहिजेअसेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

000000

सुधारित दौरा : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 सुधारित दौरा :

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

चंद्रपूरदि. 29 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे 1 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या  दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता मोरवा येथील विमानतळावर आगमन. सकाळी 10.35 वाजता मोरवा विमानतळावरून वन अकादमीकडे प्रयाणसकाळी 10.55 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीवसकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध मान्यवरांची भेट व चर्चादुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीवदुपारी 2 वाजता वन अकादमी येथून पोंभुर्णाकडे प्रयाणदुपारी 2.45 वाजता पोंभुर्णा येथे आगमन व 3 वाजेपर्यंत आदिवासी मेळाव्यानिमित्त विविध स्टॉलची पाहणीदुपारी 3 ते 3.50 वाजेपर्यंत आदिवासी मेळाव्याला उपस्थितीदुपारी 4 वाजता पोंभुर्णा येथून प्रयाण,  संध्याकाळी 4.45 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव. रात्री वन अकादमी येथे मुक्काम.

2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.45 वाजता वन अकादमी येथून मोरवा विमानतळ कडे प्रयाण व त्यानंतर हेलिकॉप्टरने प्रयाण.

००००००

Saturday 28 September 2024

आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल

 











आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

Ø जिल्ह्यातील महिला बचत गटांना 292 कोटींचे अर्थसहाय्य

Ø महिला मार्गदर्शन मेळाव्यासाठी लाडक्या बहिणीचा उत्स्फुर्त प्रतिसाद

चंद्रपूरदि. 28 : कोणत्याही व्यापार किंवा व्यवसायामध्ये आता केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिली नाही. महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य संधी मिळाली तर त्या संधीचे सोने करतात. चंद्रपूर जिल्ह्यातील 3 लक्ष महिला भगिनी महिला बचत गटांशी जुळल्या आहेत. या बचत गटांना 292 कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले असून चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहेही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. भविष्याताही ही वाटचाल अशीच पुढे जाणार असून बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल. त्यातून आत्मनिर्भरता आणि स्त्री शक्तीचा जागर वाढेलअसा विश्वास राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

चांदा क्लब ग्राऊंड येथे जिल्हा प्रशासन व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महिला मार्गदर्शन मेळाव्यात पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवारमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनसहायक जिल्हाधिकारी कश्मीरा संख्येमनपा आयुक्त विपिन पालीवालअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष चौधरीउपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळुंखेगिरीश धायगुडेपालिका प्रशासन अधिकारी वर्षा गायकवाडमनपाचे उपायुक्त मंगेश खवलेजिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईतनगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल वाघमाविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळेराहुल पावडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून स्त्री शक्तीचे दर्शन झालेअसे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेमहाराष्ट्राचे वर्णन चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे चांदा हा राज्यात प्रथमच असला पाहिजे. आपल्या जिल्ह्यात क्षमतेची कुठेही कमतरता नाहीफक्त महिलांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. संधी मिळाली की त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. महिला बचत गटांना 292 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले असून यात चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यात 4 लक्ष 70 हजार अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 2 लक्ष 75 हजार बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा सुद्धा झाले आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत संपूर्ण 4 लक्ष 70 हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चंद्रपूर जिल्हा राज्यात पहिल्या दहा क्रमांकात आहे. मात्र अजूनही काही महिलांचे आधार सिडींग नसल्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही. वंचित राहिलेल्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बचत गटांनी सहकार्य करावे. कोणतीही बहीण या योजनेपासून वंचित राहता कामा नये. तसेच ही योजना कोणीही बंद करू शकणार नाहीआज दरमहा 1500 रुपये या योजनेत दिले जातेभविष्यात यात वाढ होणार आहेअसे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जुन सांगितले.

पुढे ते म्हणालेउद्योगांमध्ये सुद्धा महिलांना आरक्षण देण्यात येत आहे. एमआयडीसी मध्ये महिलांना उद्योगांसाठी 20 टक्के प्लॉट आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुदानित शाळाआश्रम शाळेत महिला बचत गट वस्तुंचा पुरवठा करण्यास सक्षम असून बचत गटांना अनेक कामे सरकारने दिले आहे. तसेच शिवणकाम प्रशिक्षण सुद्धा देणे सुरू असून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा गणवेश संबंधित गावातच तयार झाला पाहिजेअसा आपला आग्रह आहेअसे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

 हा बहिणींचा सन्मान निधी : आमदार किशोर जोरगेवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत जिल्हा अग्रक्रमावर आहे. या योजनेमुळे बहिणी खुश झाल्या असून बहिणींना किमान 100 रुपये रोज मिळावेम्हणजे महिन्याला तीन हजार रुपये बहिणीच्या खात्यात जमा व्हावेअशी आपली मागणी आहे. महिलांच्या महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे बहिणींना हा सन्मान निधी देण्यात येत आहे. ज्या बहिणींच्या अर्जात तांत्रिक कारणामुळे त्रुटी आहेतत्या त्वरित दूर कराव्यातअशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.

बचत गटांच्या उत्पादनासाठी मॉलची निर्मिती : जिल्ह्यातील महिला बचत गटांनी आता तंत्रज्ञानसोलरसर्विस सेक्टरउत्पादनांची मार्केटिंगपॅकेजिंग या क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्याची गरज आहे. बचत गटाच्या वस्तूंसाठी चंद्रपुरात कृषी विभागाच्या जागेवर उत्कृष्ट मॉल तयार होत आहे. यात फूड कोर्टप्रदर्शनी सेंटरप्रशिक्षण सभागृह आदी सुसज्ज राहणार आहे. तालुका स्तरावरही बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी असे मॉल उभे करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. रिलायन्स पेक्षाही आपला मॉल उत्कृष्ट राहीलअशी अपेक्षा पालकमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

वन विभागात आता वनसखी

चंद्रपूर जिल्ह्यात कृषी सखीवॉर्ड सखी सुरू करण्यात आली असून सखी’ या शब्दातच प्रेम जाणवते. वनविभागात सुद्धा वनसखी’ करण्याचा निर्णय आपल्या विभागाने घेतला आहे.

विविध लाभार्थ्यांचा सत्कार व धनादेश वाटप

यावेळी माविमच्या माधुरी वाकडेवैशाली गोवर्धनदेवीनंदा भोयरकीर्ती चंदनमलाधारनसरीत बानो मोहम्मद हारूनसंध्या घरात यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कल्याणी रायपुरे आणि प्रियतमा खातखेडे यांना 1500 रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. लखपती दीदी अंतर्गत लीना मॅडावारअर्चना टेकामलता खोब्रागडेउज्वला गेडाम यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. दाताळा येथील सरस्वती समूह आणि जामतुकूम येथील संतोषी उत्पादक गट यांना धनादेश वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेले प्रियंका मोटघरेअक्षता रामटेकेचांदणी शेंडेअस्मिता आत्रामसुश्मिता गिठणलवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

महिलांना पैठणी आणि सुरक्षा कीट : लकी ड्रॉ द्वारे निवड करण्यात आलेल्या पाच महिलांना पैठणी प्रदान करण्यात आली. यात सुलोचना नैतामकल्पना शेडमाकेशकुंतला चालखुरेगीता कार्लेकरअन्नपूर्णा राऊत यांचा समावेश होता. तसेच लकी ड्रॉ द्वारे निवड झालेल्या शीतल दरेकरमाधुरी टेकाममोहिता बोंडेसविता नेवारेसुनिता किसनाशिले यांना सुरक्षा किट तर विजया गोटमुखलेवासंती नन्नावरेविद्या सदनपवारअंकिता चंद्राशुभांगी ढगे यांना लकी ड्रॉ द्वारे अम्माचा टिफिन देण्यात आला.

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणालेमहिला शिक्षित तर कुटुंब शिक्षित होते. महिलांमुळेच कुटुंबात आर्थिक साक्षरता निर्माण होते. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 4 लक्ष 73 हजार 70 अर्ज प्राप्त झालेयापैकी 4 लक्ष 64 हजार 800 महिलांना लाभ मिळणार आहे. उर्वरित महिलांनी या योजनेकरिता अर्ज करावे. मुख्यमंत्री लाडके बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणाची महत्त्वाची पायरी आहे. जिल्ह्यामध्ये तीन लक्ष महिलाबचत गटांसोबत जुळल्या असून बचत गटांना 292 कोटीचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्हा राज्यात क्रमांक एकवर आहेअसेही त्यांनी सांगितले.

यावेळी पोंभुर्णा येथील माविमच्या महिला बचत गटाच्या सरिता मून आणि उमेदच्या शुभांगी गोवर्धने यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी स्टॉलची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी मानले.

0000000000