Search This Blog

Wednesday 18 September 2024

पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त - राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल






 पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त

- राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

Ø जागतिक बांबू दिनी चर्चासत्राचे आयोजन

Ø चर्चासत्राला पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची उपस्थिती

मुंबई,दि. १८ : जागतिक तापमानातील वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती आणि पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मानवजाती आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी बांबू शेती करणे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे.

१८ सप्टेंबर हा दिवस जगभरात बांबू दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित जागतिक बांबू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला पद्मश्री भारत भूषण त्यागी, पद्मश्री कमल सिंग, पद्मश्री गेनाजी चौधरी, पद्मश्री सुलतान सिंग, पद्मश्री चंद्रशेखर, पद्मश्री जगदिश प्रसाद पारेख, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, प्रधान सचिव प्रवीण दराडे, दूरदर्शन निवेदिका मेघाली दास व्यासपीठावर उपस्थित होत्या.

श्री. पटेल पुढे म्हणाले की, भारतातील राज्यांमध्ये तापमानात वाढल्याची नोंद झाली आहे. दुबईत सुद्धा प्रचंड तापमानात वाढ झाली आहे. कार्बन उत्सर्जनामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे. ऑक्सिजन वाढविण्यासाठी झाडे लावल्याशिवाय पर्याय नाही. मानवजाती आणि पृथ्वीचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हरित ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हरित महाराष्ट्र बनविण्यासाठी ठोस निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शाश्वत उत्पन्नासाठी बांबू शेतीची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी आणि सर्वाधिक ऑक्सिजन निर्माण करणारी बांबू शेती करण्याची गरज आहे. या चर्चासत्र कार्यक्रमामुळे शेतकरी, शास्त्रज्ञ आणि सरकार यांना एका छताखाली आल्याने मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बांबू शेतीसाठी महाराष्ट्रातच नाही तर देशभरात काम करावे लागेल, असे आवाहन श्री पटेल यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्र्यांचा गौरव

राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्रासंबंधी निर्णयाचे जगभरातील बहुतांशी देशांनी कौतुक केले आहे. त्यामुळे जगभरातील १७ देशातील आणि भारतातील १७ राज्यांच्या प्रतिनिधींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव होत आहे. महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धनासह बांबू शेती क्षेत्रात मोठे काम होत आहे. जगभरात त्याची दखल घेतली जात आहे, असे गौरवोद्गार श्री पटेल यांनी काढले.

पद्मश्री भारत भूषण त्यागी यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी मानवी चेतना जागृत करण्याची गरज आहे. बांबू हे केवळ झाड नसून नैसर्गिक संरचनेतील महत्त्वाचा अंग आहे. बांबू शेतीची महाराष्ट्रातून पायाभरणी होत असल्याची मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी एमआरईजीएसचे महासंचालक नंदकुमार, प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र या योजनेविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमात  राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, झारखंड, आसाम, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आदी राज्यातील प्रगतीशील शेतकरी, आयआयटी दिल्ली, खरकपूर, विविध संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञ, उद्योजक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

.

00000000

No comments:

Post a Comment