Search This Blog

Thursday 12 September 2024

कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगाचे (पॅरा वील्ट) व्यवस्थापन

 

कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगाचे (पॅरा वील्ट) व्यवस्थापन

         चंद्रपूर, दि.12 : सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तथा मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक  मर (पॅरा वील्ट) हा रोग दिसून येत आहे. साधारणत: आकस्मिक मर ही ‍विकृती पीक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेले असताना अधिक प्रमाणत दिसून येते. पावसाच्या मोठ्या खंडामुळे, कपाशी पिकास पावसाचा ताण बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेले जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर या विकृतीचा कापूस पिकावर  प्रादुर्भाव दिसून येतो.

आकस्मिक मर या विकृतीमुळे कापसाच्या झाडातील तेजपणा नाहीसा होऊन झाड सुकल्यासारखे दिसते. तसेच त्यांनतर प्रादुर्भावग्रस्त कपाशीची सर्व पाने फुले खालच्या  दिशेने वाकतात किंवा पिवळे पडतात. तसेच  पात्या फुले व अपरिपक्व बोंडे सुकून गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मूळे कुजत नाहीत. रोगग्रस्त झाडास हमखास नवीन फुट येते.

आकस्मिक मर रोगावर उपाययोजना : कापूस पिकाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास पाणी द्यावे. पिकास प्रदीर्घ पाण्याचा ताण पडू देऊ नये.  अतिवृष्टी  झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे. शेतातील  पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अत्यंत महत्वाचे आहे.

आकस्मिर मर या विकृतीचे लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी खालीलपैकी आळवणी करावी. यासाठी एका बुरशीनाशकाचा वापर करावा. कॉपर ऑक्सीक्लोराइड (25 ग्रॅम) किंवा कार्बेन्डाझीम (10 ग्रॅम) +युरिया (200 ग्रॅम)/10 लीटर पाणी या प्रमाणात द्रावण करुन प्रती झाडास 250-500 मिली द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी करावी. त्यांनतर 8 ते 10 दिवसांनी 2 टक्के डीएपी (200 ग्रॅम/10 लि. पाणी याची आळवणी करुन लगेच हलके पाणी द्यावे.

            वरीलप्राकरे कपाशीवरील आकस्मिक मर रोगाचे नियोजन करण्यात यावे, असे आवाहन कृषी विद्यापीठ व कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

०००००

No comments:

Post a Comment