मतदार जागरुकता आणि सहभाग वाढवण्यासाठी साप्ताहिक स्पर्धांचे आयोजन
Ø चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी स्वीप उपक्रम
Ø 5 हजारांपासून 1.2 लाखांपर्यंतची बक्षीसे जिंकण्याची संधी
चंद्रपूर, दि. 23 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत विविध साप्ताहिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश 18 वर्षावरील पात्र मतदारांची नोंदणी करणे, अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे व मतदान प्रक्रियेशी संबंधित महत्वपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, हा आहे.
एकूण 5 आठवडयांमध्ये उपक्रमाचे भाग पाडण्यात आले आहे. ज्यात सोमवार ते शनिवार इच्छुक नागरिक सहभागी होऊ शकतील आणि प्रत्येक रविवारी त्या आठवडयाचे निकाल जाहीर करण्यात येतील. दि. 23 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्रत्येक आठवडयात विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ज्यात गुगल फॉर्मद्वारे क्विज, निबंध लेखन स्पर्धा, आणि मतदान प्रक्रियेवर आधारित व्हिडिओ तयार करण्याचे कार्यक्रम आहेत. सहभागी नागरिकांना लकी ड्रॉ द्वारे रोख व रोमांचक बक्षिसे दिले जातील. उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी चंद्रपर जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या वेबसाईटबर संबंधित साप्ताहिक स्पर्धांची माहिती व गुगल फॉर्म लिंक उपलब्ध आहे.
आठवडावार उपक्रमे खालीलप्रमाणे :
1. पहिला आठवडा (23 ते 28 सप्टेंबर 2024 ) : गुगल फॉर्मवर 4 मल्टिपल चॉइस प्रश्नांची उत्तरे देण्याचे आयोजन करण्यात आले आहे. लकी ड्रॅा द्वारे निवडलेल्या विजेत्याला 5 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
2. दुसरा आठवडा (30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2024 ) : यामध्ये गुगल फॉर्मवर 5 मल्टिपल चॉइस प्रश्नांची उत्तरे देण्याचे आयोजन केले आहे. ज्यात लकी ड्राद्वारे विजेत्याला 10 हजार रुपये बक्षीस दिले जाईल.
3. तिसरा आठवडा (7 ते 12 ऑक्टोबर) : 100 शब्दांमध्ये गुगल फॉर्मद्वारे ‘मतदानाचे महत्व’ या विषयावर निबंध लेखन स्पर्धा होईल. विजेत्याला 15 हजारांचे बक्षिस देण्यात येईल.
4. चवथा आठवडा (14 ते 19 ऑक्टोबर) : 150 शब्दांमध्ये गुगल फॉर्मद्वारे मतदान केंद्रावर नेण्याची महत्वाची कागदपत्रे” या विषयावर निबंध लेखन स्पर्धा होईल. विजेत्याला 20 हजारांचे बक्षीस दिले जाईल.
5. पाचवा आठवडा (21 ते 26 ऑक्टोबर): “ मी माझे मत मतदान केंद्रावर कसे देणार?” या प्रक्रियेचे वर्णन करणारा 1 मिनिटाचा व्हिडिओ तयार करुन गुगल फॅार्म लिंकवर अपलोड करायचा आहे. लकी ड्रा द्वारे निवडलेल्या विजेत्याला 30 हजारांचे बक्षीस दिले जाईल
6 मतदान दिवस : मतदान केंद्रावर सेल्फी काढून अपलोड केल्यास 1.2 लाख रुपये किंमतीचे 3 विजेत्यांना रोमांचक बक्षिसे मिळवण्याची संधी आहे.
००००००
No comments:
Post a Comment