Search This Blog

Friday, 30 October 2026

कमाल भाडेदरापेक्षा जादा भाडे आकारल्यास परिवहन विभागाकडे तक्रार करा


कमाल भाडेदरापेक्षा जादा भाडे आकारल्यास परिवहन विभागाकडे तक्रार करा

Ø खाजगी ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीवर परिवहन विभागाची नजर

Ø नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

चंद्रपूर, दि. 30 : सणासुदीच्या व गर्दीच्या हंगामात खाजगी प्रवासी बसेसकडून अवाजवी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शासनाने निश्चित केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.

सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्याने पुणे, नागपूर, अमरावती, हैदराबाद, यवतमाळ, नाशिक आदी शहरांकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसना मोठी मागणी असते. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही खाजगी वाहतूकदारांकडून अवाजवी भाडेवाढ केली जाते. प्रवाशांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी शासनाने खाजगी कंत्राटी प्रवासी वाहनांचे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत.

खाजगी कंत्राटी प्रवासी वाहनांच्या भाडेदराबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्र. 149/2011 मध्ये न्यायालयाने शासनाला भाडेदर निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 27 एप्रिल 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये खाजगी कंत्राटी प्रवासी वाहनांचे कमाल भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्याच स्वरूपाच्या संपूर्ण बससाठी लागू असलेल्या प्रतिकिलोमीटर भाडेदराच्या तुलनेत खाजगी कंत्राटी वाहनांचे भाडे 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढीव असू नये, अशी तरतूद करण्यात आली आहे.

खाजगी ट्रॅव्हल्सची विशेष तपासणी मोहीम : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खाजगी ट्रॅव्हल्सच्या भाडे आकारणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक खाजगी ट्रॅव्हल्स मालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन शासन निर्णयानुसार भाडे आकारण्याच्या सूचना देत आहेत. तपासणीदरम्यान कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारल्याचे आढळल्यास संबंधित वाहतूकदाराविरुद्ध मोटार वाहन कायदा, 1988 मधील तरतुदींनुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे.

प्रत्येक ट्रॅव्हल्स कार्यालयात भाडेदराचा फलक लावण्याचे निर्देश : प्रवाशांना अधिकृत भाडेदराची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी चंद्रपूर येथून विविध शहरांकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना मार्गनिहाय भाडेदराचा तक्ता तयार करून तो कार्यालयातील दर्शनी भागात लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खाजगी वाहतूकदारांनी स्पर्धात्मक वातावरणात वाजवी भाडे आकारून प्रवाशांना दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

जादा भाडे आकारल्यास येथे करा तक्रार : शासनाने निश्चित केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास प्रवाशांनी खालील माध्यमांद्वारे तक्रार नोंदवावी. ई-मेल : dyro.34-mh@gov.in आणि dytcinspect.tpt-mh@gov.in तसेच व्हॉट्सॲप क्रमांक 7588473434 यावर तक्रार नोंदविता येऊ शकते.

अवाजवी भाडे आकारणीबाबत प्रवाशांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे. तसेच सर्व खाजगी ट्रॅव्हल्स वाहतूकदारांनी शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment