Search This Blog

Friday, 30 October 2026

तुरीवरील शेंगा पोखरणा-या अळ्यांचे व्यवस्थापन


तुरीवरील शेंगा पोखरणा-या अळ्यांचे व्यवस्थापन

चंद्रपूर, दि. 30 : सध्या तुर हे पीक फुलोरा अवस्थेत आहे. मागील काही आठवड्यातील असणारे सततचे ढगाळ, कोरडे वातावरण व रात्रीचे थंड हवामान, तूर पिकावरील पोखरणीच्या वाढीस पोषक आहे. अशा वातारणामुळे तूर पिकाला पोखरणा-या अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शेंगा पोखरणा-या अळ्यांमध्ये  खालील प्रकारच्या अळ्यांचा समावेश होतो.

शेंगा पोखरणारी अळी : या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या, तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मि. मि. लांब, विविध रंग छटेत दिसून येते. जसे पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाची असून तिच्या पाठीवर तुटक रेषा असतात. मोठया अळ्या शेगांच्या आतील दाने पोखरून खातात.

 पिसारी पतंग या पतंगाची अळी 12.5 मि.मि.लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात, अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते. शेंगे माशी या माशीची  अळी बारीक गुळगुळीत व पांढ-या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाणे अर्धवट कुरतडुन खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.

एकात्मिक व्यवस्थापन : या तिन्ही किडी, कळया, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्याच्या व्यवस्थापनाकरिता  सारखेच उपाय योजावे लागतात. 1) प्रति हेक्टर 20  पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी  किडीच्या अळ्यास खाऊन फस्त करतात, तसेच घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत.

आर्थिक नुकसान संकेत पातळी : घाटेअळी 5-6 पतंग प्रति 2-3 दिवसात किंवा 1 अळी प्रति झाड किंवा 5-10 टक्के नुकसान, पिसारी पंतग 5 अळ्या/ 10 झाडे अशी आर्थिक नुकसान धोक्याची पांतळी गाठताच खालील उपाययोजना कराव्यात.

पहिली फवारणी (50 टक्के फुलोरावर असताना) : निबोंळी अर्क 5 टक्के किंवा ॲझाडिरेक्टीन 300 पीपीएम 1000 मिली प्रति एकर किंवा ॲझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 500 मिली प्रति एकर किंवा एच.ए.एन.पी.व्ही. (1X10 पिओबी मिली) 20 एल.ई. प्रति 25 ई.सी. 400 मि.ली. प्रति एकर या प्रमाणे कोणत्याही एक किटकनाशकांचा पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी) : इमामेक्टीन बेझोएट 5 एस. जी. 60 ग्रॅम प्रति एकर किंवा लॅब्डा सायहॅलोथ्रीन 5 टक्के ईसी 200 मिली प्रति एकर किंवा ईथिऑन 50 टक्के ईसी 500 मिली प्रति एकर किंवा  क्लोरॅनटॅ्नीलिप्रोल18.5 टक्के एस.सी प्रवाही 60 मिली प्रति एकर याप्रमाणे कोणत्याही  एक किटकनाशकांची पाण्यात मिसळून फवारणी करवी

०००००००

No comments:

Post a Comment