विशेष लेख :
महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत
चंद्रपूर : जमीन हा शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. जमिनीची मालकी, हक्क, वाटणी, फेरफार, महसुली नोंदी तसेच अन्य कारणांमुळे वादाची निर्मिती होते. अनेकदा हे वाद वर्षानुवर्षे महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित राहतात. न्याय मिळविण्यासाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यातून वेळ, पैसा आणि श्रम खर्ची पडतात. अनेकदा एका स्तरावर निर्णय झाल्यानंतरही अपील किंवा इतर कारणामुळे वाद अधिक काळ सुरू राहतात. या परिस्थितीत नागरिकांना जलद, सुलभ आणि परस्पर सहमतीतून न्याय मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
महात्मा फुले यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी आयुष्यभर सामाजिक न्याय, समता, शेतकऱ्यांचे हित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी कार्य केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे, ही त्यांच्या विचारांची मूलभूत प्रेरणा होती. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने महसूल प्रशासनातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करण्यासाठी या अभियानाला मान्यता दिली आहे. 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत संपूर्ण राज्यात हे अभियान राबविण्यात येत आहे.
महसुली वादांच्या निपटाऱ्यासाठी प्रभावी पर्याय : महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये विविध स्वरूपाचे महसुली दावे आणि अपील प्रलंबित असतात. या पार्श्वभूमीवर महसूल लोक अदालत हे परस्पर सहमतीने वाद मिटविण्यासाठी उपयुक्त व्यासपीठ ठरणार आहे. दोन्ही पक्षकारांची संमती, कायदेशीर तडजोडनामा आणि सक्षम महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशाद्वारे प्रकरणांचा निपटारा या अभियानात करण्यात आली आहे.
सर्व स्तरांवरील प्रलंबित महसुली प्रकरणांचा समावेश : या अभियानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महसूल प्रशासनातील विविध स्तरांवरील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या महसुली दाव्यांचा आणि अपीलांचा यात समावेश करण्यात आला आहे. विशेषतः शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महसुली वादांमुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना या अभियानाचा लाभ होऊ शकतो.
तीन महिन्यांतून एकदा महसूल लोक अदालत : या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तीन महिन्यांतून एकदा सर्व महसूल स्तरांवर लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. चंद्रपूर येथे 7 ऑक्टोबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर 4 डिसेंबर 2026 आणि 17 फेब्रुवारी 2027 रोजी महसूल लोक अदालत होणार आहे.
तडजोडीसाठी अर्ज कसा करावा : महसूल लोक अदालत अभियानाचा लाभ घेण्याची प्रक्रिया नागरिकांसाठी सुलभ ठेवण्यात आली आहे. ज्या अर्धन्यायिक न्यायालयात किंवा महसूल कार्यालयात संबंधित दावा प्रलंबित आहे, त्याच कार्यालयात दोन्ही पक्षकारांनी स्वतः किंवा त्यांच्या वकिलांमार्फत शासनाने निर्धारित केलेल्या ‘प्रपत्र-अ’ या नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज सादर करावयाचा आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित कार्यालयामार्फत त्याची छाननी करण्यात येईल. दोन्ही पक्षकार तडजोडीसाठी स्वेच्छेने सहमत आहेत किंवा नाही, याची खात्री केली जाईल. त्यानंतर कायदेशीर तडजोडनामा तयार करून संबंधित पक्षकारांकडून प्राप्त केला जाईल.
शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा : महसुली वादांचा सर्वाधिक परिणाम अनेकदा शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांवर होतो. जमिनीशी संबंधित वाद प्रलंबित राहिल्याने कुटुंबांमध्ये मतभेद निर्माण होतात. शेतीचे नियोजन, जमिनीचे व्यवहार आणि मालमत्तेशी संबंधित निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत तडजोडीच्या माध्यमातून प्रकरणांचा निपटारा झाल्यास संबंधित पक्षकारांना मोठा दिलासा मिळू शकतो.
महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ : महसूल लोक अदालत अभियानामुळे तडजोडीने निकाली निघू शकणारी प्रकरणे वेगाने मार्गी लागल्यास प्रलंबित दाव्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. त्याचबरोबर इतर प्रकरणांच्या सुनावणीसाठी महसूल यंत्रणेला अधिक वेळ उपलब्ध होऊ शकेल. या अभियानातून प्रशासनाची कार्यक्षमता वाढविणे, न्यायप्रक्रियेला गती देणे आणि नागरिकांचा महसूल यंत्रणेवरील विश्वास दृढ करणे, ही उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होणार आहे.
गावपातळीपर्यंत अभियानाची जनजागृती : या अभियानाची माहिती केवळ जिल्हा किंवा तालुका मुख्यालयापुरती मर्यादित राहू नये, यासाठी शासनाने व्यापक प्रसिद्धीच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयांच्या संकेतस्थळांवर तसेच दर्शनी भागातील सूचना फलकांवर अभियानाची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महात्मा फुले यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन : महात्मा जोतिराव फुले यांनी शेतकरी, कष्टकरी, वंचित आणि दुर्बल घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी केलेले कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहे. न्याय हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावा आणि त्यासाठी अनावश्यक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागू नये, या व्यापक सामाजिक भूमिकेशी महसूल लोक अदालत अभियानाची संकल्पना सुसंगत आहे. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या नावाने राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ प्रशासकीय मोहीम न राहता, महसुली न्याय अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो.
नागरिकांनी अभियानाचा लाभ घ्यावा : महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, प्रलंबित महसुली वादांचा निपटारा व्हावा आणि न्यायप्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी सर्व संबंधित पक्षकारांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.
०००००००

No comments:
Post a Comment