Search This Blog

Thursday 10 December 2020

जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात अद्यावत आरोग्य यंत्रणा उभारा




 

जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात अद्यावत आरोग्य यंत्रणा उभारा

जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री यांचे निर्देश

 

चंद्रपूर, दि. 10 डिसेंबर : नागरिकांचे आरोग्य हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असून त्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात एकाच छताखाली सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या व उपचार करता येईल यादृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात अद्यावत वैद्यकीय यंत्रणा मॉड्युलर ऑपरेशन थियेटरसह उभारण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज आरोग्य यंत्रणेला दिले.

            पालकमंत्री यांनी आज नियोजन भवन येथे सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत विविध विभागाच्या लागोपाठ बैठका घेवून विकास कामांचा आढावा घेतला. यात जिल्हा क्रिडा समितीची बैठक, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सा.बा.विभागांतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत आढावा बैठक. ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही तालुक्यातील शासकीय कार्यालये व निवासस्थानाचे बांधकामसाठी लागणाऱ्या जमिनीसंबंधात आढावा बैठक. जिल्ह्यातील पुरातन भागाचा विकास, महाकाली मंदिर परिसरातील विकास कामे, ज्युबली हायस्कूल परिसरातील कामे याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक तसेच जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठकींचा समावेश होता.

            बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे,  नियोजन अधिकारी गजानन वायाळ, सार्वजनिक बांधकामच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, समजाकल्याणचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर इ. प्रामुख्याने उपस्थित होते.

            सावली, सिंदेवाही व ब्रम्हपुरी भागात विश्रामगृह, अभ्यासीका, उद्यान तसेच  डॉक्टरांचे निवासस्थान, उपविभागीय कार्यालय व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, क्रिडांगण तसेच स्मशानभुमी इत्यादी प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र कामासाठी शासकीय जमीनीच्या हस्तांतरणास उशीर होत असल्याबद्दल पालकमंत्री यांनी नाराजी व्यक्त करून संबंधीत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व नगरपरिषदेचे अधिकारी यांना पुढील दहा दिवसात सदर शासकीय जमीन हस्तांतरणाची कार्यवाही पुर्ण करण्याचे निर्देश दिले. 

            जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री वडेट्टीवार यांनी कौशल्य विकास, वनविभाग, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, नगरविकास, आदिवासी विकास, ग्रंथालय व इतर विभागांचा आढावा घेवून प्राप्त निधी मार्चपुर्वी पुर्णत: खर्च पडेल याद्ष्टीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

            यावेळी संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment