Search This Blog

Friday 18 December 2020

वाघाच्या हल्ल्यात मयताचे कुटूंबाला वनविभागाची तातडीने मदत

 वाघाच्या हल्ल्यात मयताचे कुटूंबाला वनविभागाची तातडीने मदत

Ø  कोअर व बफर क्षेत्रात मजुरांकडून कामे करीत असतांना सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देश

चंद्रपूर, दि. 18 डिसेंबर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा-चिखलवाही कोअर क्षेत्रामध्ये रोजंदारी मजुरांकडुन जाळरेषा काढण्याचे कामे सुरु असतांना विद्या संजय वाघाडे या 38 वर्षीय मजूर महिलेचा वाघाने केलेल्या हल्ल्यामध्ये दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. ही माहिती मिळताच उपसंचालक (कोअर), उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर व ईतर पोलीस अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी कोलारा व ताडोबा तसेच इतर वनकर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली व कुटूंबाचे सांत्वन केले. क्षेत्रसंचालक यांनी मयताचे कुटूंबाला आर्थिक मदत व इतर मदत करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. सदरहू घटनेची गंभीर दखल घेत शासन निर्णयानुसार वनविभागाकडुन मयताच्या कुटूंबाला घटनास्थळी आर्थिक मदत देण्यात आली.

या व्याघ्र प्रकल्पामध्ये जाळरेषा काढण्याची कामे नियमित सुरु असतांना अशा प्रकारची अनपेक्षीत घटना प्रथमच घडलेली आहे. भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याकरीता क्षेत्रसंचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी तातडीने आदेश काढून कोअर व बफर क्षेत्रात मजुरांकडून समूहाने कामे करीत असतांना त्यामधून एक सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरुन तो आजूबाजुच्या परिसरावर लक्ष व नियंत्रण ठेवेल. त्यामुळे संभावित धोक्यापासून मजुरांना वेळीच सुचीत करात येईल. सदरहू आदेश हा सद्यास्थितीत सुरु असलेली व भविष्यात होणाऱ्या कामासाठी तातडीने लागू करण्यासंदर्भात सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे, असे वनसंरक्षक तथा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी कळविले आहे.

000

No comments:

Post a Comment