Search This Blog

Wednesday, 30 December 2020

शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 


शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Ø  मदतीसाठी 10 प्रकरणे पात्र

चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर : नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या कारणास्तव आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्ह्यातील एकूण 20 प्रकरणांपैकी 10 प्रकरणे पात्र ठरविण्यात आले असून नऊ प्रकरणे अपात्र तर एक प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. याअंतर्गत उपजिल्हाधिकारी गव्हाळ यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढली.

पात्र प्रकरणात नागभिड तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त तुळशीराम पाथोडे, राजुरा तालुक्यातील नलफडी येथील अतुल धानोरकर, बोटगाव येथील नितेश ठावरी, येरगव्हाण येथील शत्रुघ्न बावणे, गोवरी येथील अनिल देवाळकर व सुमठाणा येथील प्रमोद मोरे, मूल तालुक्यातील नवेगाव येथील संदिप झाडे,  गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील निळकंठ आमने तसेच चेकतळाधी येथील प्रदिप भोयर, वरोरा तालुक्यातील माढेळी येथील अशोक डंबारे आणि चिमूर तालुक्यातील टेकेपार येथील सौरभ कुळमेथे यांच्या प्रकरणांचा समावेश होता.

बैठकीला पोलीस विभाग, आरोग्य व कृषी  विभागाचे तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा अग्रणी बँक व कृषी विकास अधिकारी कार्यालयाचे संबंधीत अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment