ग्रामीण भागाच्या मुलभूत सोई सुविधांसाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर
Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश
चंद्रपूर, दि. 26 : ग्रामीण क्षेत्राचा विकास झाला तरच जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकतो, असा ठाम विश्वास बाळगणारे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ग्रामीण भागात मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव आग्रही असतात. त्यानुसार त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण क्षेत्रातील विकासकामांसाठी 5 कोटी रुपये मंजूर झाल्यामुळे गावक-यांनी आभार व्यक्त केले आहे.
गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून निधीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येतात. यात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागात मुलभूत सुविधांसाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यात बल्लारपूर तालुक्यातील विविध गावांसाठी 1 कोटी रुपये, चंद्रपूर तालुक्यातील गावांसाठी 1 कोटी 60 लक्ष रुपये, मूल तालुक्यासाठी 1 कोटी 15 लक्ष रुपये, पोंभुर्णा तालुक्यासाठी 1 कोटी 15 लक्ष रुपये तर गोंडपिपरी तालुक्यातील चेक लिखितवाडा येथे स्मशनभुमीचे शेड बांधकाम व तारेचे कुंपण करण्यासाठी 10 लक्ष रुपये असे एकूण 5 कोटी रुपये मुलभूत सुविधा पुरविण्याकरीता मंजूर झाले आहेत.
या निधीमधून चंद्रपूर तालुक्यातील लोहारा येथे 50 लक्ष रुपयांत गोलकर समाजाकरिता सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील शिक्षक कॉलनीच्या ओपन स्पेसमध्ये लोखंडी शेड, संरक्षण भिंत आणि वॉकिंग ट्रॅक (30 लक्ष रुपये), मानोरा (ता. बल्लारपूर) येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम (30 लक्ष रुपये), मूल तालुक्यातील येरगाव येथे कुणबी समाजाकरीता सामाजिक सभागृह बांधकाम करणे (30 लक्ष रुपये), मूल तालुक्यातील बोरचांदली येथे केवट समाजाकरीता सामाजिक सभागृहाचे बांधकाम (30 लक्ष रुपये) याशिवाय विविध गावांत सिमेंट रस्त्याचे बांधकाम, रस्त्याचे खडीकरण, चौकाचे सौंदर्यीकरण, पाणंद रस्त्याचे बांधकाम, स्मशान भुमीकरीता रस्ता तयार करणे, नालीचे बांधकाम आदी मुलभूत कामे करण्यात येणार आहे. गावाच्या विकासासाठी 5 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल गावकऱ्यांकडून ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले जात आहे.
००००००
No comments:
Post a Comment