अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना
Ø उद्योगासाठी तरुणांना मिळणार 15 लाख
चंद्रपूर दि. 12 : उद्योजक बनू इच्छिणाऱ्या मराठा समाजातील युवकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प योजना राबविण्यात येतात.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत 10 लाखांची असलेली मर्यादा आता 15 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगासाठी तरुणांना 15 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतल्यास त्यांचे व्याज महामंडळ भरणार आहे. त्यासाठी मात्र रकमेची मर्यादा असणार आहे. यापूर्वी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाख रुपये होती. महामंडळाचे कर्ज घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नियमित कर्जफेड करणाऱ्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे महामंडळाने व्याज परतावा योजनेची मर्यादा 15 लाखापर्यंत वाढविली आहे. या अंतर्गत व्याज परतावा 4लाख 50 हजार मर्यादेत असणार आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजना:
1)वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत उद्योग उभारणी, नवीन व्यवसाय सुरू करणे अशा विविध कामांसाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध झाल्यानंतर महामंडळ त्याचे व्याज भरते.
योजनेचे निकष : उमेदवारास वयोमर्यादेची अट पुरुष व महिलांकरीता जास्तीत जास्त 60 वर्षे आहे. वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाखापर्यंत असावी. तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थीने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
2)गट कर्ज व्याज परतावा योजना : दोन व्यक्तीसाठी मर्यादा 25 लाख, तीन व्यक्तीसाठी 35 लाख, चार व्यक्तीसाठी 45 लाख आणि पाच व पाचपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 लाखांच्या मर्यादेवरील कर्जावर व्याज परतावा महामंडळ करेल.
योजनेचे निकष : या योजनेअंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एल.एल.पी. कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट व संस्था लाभास पात्र असतील.
3)गट प्रकल्प कर्ज योजना : एकूण प्रकल्प रकमेच्या 10 टक्के रक्कम गटाने जमा करणे बंधनकारक असेल तर उर्वरित 90 टक्के रक्कम (दहा लाखांच्या मर्यादेत) महामंडळ कर्ज स्वरूपात अदा करेल. परंतू प्रकल्पाची किंमत 11 लाखापेक्षा जास्त असल्यास गटाला प्रकल्पाची उर्वरित रक्कम इतर स्त्रोतांतून जमा करावी लागणार आहे.
योजनेच्या अटी:
महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुष व महिलांकरीता जास्तीत जास्त 60 वर्षे आहे. वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये असावे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अक्षम मापदंडाच्या अंतर्गत अर्ज करताना अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. दिव्यांगाकरीता अर्ज दाखल करत असल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील.
अर्ज कुठे करावा:
www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात अर्ज करावा. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत पहिला माळा, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा 07172-25229 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment