राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंनी घेतला मोफत जंगल सफारीचा आनंद
Ø वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या सुचना
चंद्रपूर, दि. 31 : बल्लारपूर येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरीता आलेल्या खेळाडूंना ताडोबाची जंगल सफारी मोफत करण्याच्या सुचना राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आणि पालकमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले यांच्या मार्गदर्शनात नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत 225 खेळाडूंनी मोफत जंगल सफारीचा आनंद घेतला आहे. तर पुढील दोन दिवसात आणखी 300 खेळाडूंना ताडोबा सफारी करण्यात येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.
विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनपर भाषणातच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, वाघांच्या भुमीत खेळाडूंचे आगमन झाले आहे. त्यामुळे खेळाडूंनीही वाघासारखाच पराक्रम करावा. जगातील 193 देशांपैकी 14 देशात वाघ आहेत. त्यापैकी 65 टक्के वाघ भारतात असून सर्वाधिक वाघ हे फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे राज्यभरातून बल्लारपूर येथे आलेल्या खेळाडूंना ताडोबाची मोफत जंगल सफारी दाखविण्याचे नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या.
त्यानुसार जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने टप्प्याटप्प्याने खेळाडूंना मोफत ताडोबा दाखविण्याचे नियोजन केले आहे. ताडोबातील मोफत जंगल सफारीमुळे खेळाडूंनी आणि त्यांच्या पालकांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.
०००००
No comments:
Post a Comment