आता…घरबसल्या काढा आयुष्मान कार्ड
Ø पाच लाखाचे मोफत आरोग्य विमा कवच
Ø पात्र लाभार्थीं व्यक्तींना लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 5: देशात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात दि.23 सप्टेंबर 2018 मध्ये करण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीस प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. 5 लाखाचा आरोग्य विमा देण्यात येतो. याअंतर्गत एकूण 1209 उपचार/शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आला असून देशातील शासकीय आणि अंगीकृत खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत लाभ पुरविण्यात येतो. सदर योजनेचा लाभ लाभार्थींनी मिळविण्याकरीता योजनेचे आयुष्मान कार्ड असणे गरजेचे आहे. पात्र लाभार्थी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना 2011 च्या यादीनुसार निवडण्यात आले असून यामध्ये राशन दुकानातून राशन घेणाऱ्या कुटुंबाच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकूण 9 लक्ष 70 हजार 38 लाभार्थी कुटुंबाचा समावेश असून 3 लाख 47 हजार 622 म्हणजेच, 36 टक्के लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड आतापर्यंत काढण्यात आले आहे. तर उर्वरित 6 लक्ष 22 हजार 416 पात्र लाभार्थी व्यक्तींचे कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आयुष्मान कार्ड काढण्याकरीता आधार कार्डची आवश्यकता असून वेबलिंक https://beneficiary.nha.gov.in किंवा मोबाईलमध्ये आयुष्मान ॲपच्या सहाय्याने तसेच ग्रामपंचायत येथे आपले सेवा सरकार केंद्र, सीएससी सेतू केंद्र आणि आशा स्वयंसेविका मार्फत मोफत काढण्यात येत आहे.
घरबसल्या काढा आयुष्मान कार्ड : वेबलिंक https://beneficiary.nha.gov.in किंवा मोबाईलमध्ये आयुष्मान ॲपच्या सहाय्याने पात्र लाभार्थी स्वतःचे किंवा इतर पात्र लाभार्थी व्यक्तीचे आयुष्मान कार्ड काढू शकतो. याकरीता लाभार्थ्याजवळ अँड्रॉइड 9.0 वर्जन असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे.
आयुष्मान कार्ड स्वतः काढण्याची पद्धत : मोबाईलमध्ये गुगल प्ले-स्टोअर मधून आयुष्मान ॲप डाऊनलोड व इन्स्टॉल करणे गरजेचे आहे. त्यानंतर आधार फेस आरडी ॲप इंस्टॉल करावे. आयुष्मान ॲपमध्ये बेनिफिशरी लॉगीन पर्यायाची निवड करावी. मोबाईल ओटीपीच्या सहाय्याने लॉगीन करावे. त्यानंतर सर्च पर्यायांमध्ये नाव, आधारकार्ड क्रमांक आणि राशनकार्ड ऑनलाइन आयडी (आरसीआयडी) द्वारे पात्र लाभार्थी शोधता येते. पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी किंवा फेस ऑथ (लाभार्थी यांचा मोबाईलद्वारे फोटो) च्या माध्यमातून पूर्ण करता येते.
आयुष्मान कार्ड कोण काढू शकते : आपले सरकार केंद्र, आशा स्वयंसेविका, योजनेच्या अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र आणि स्वतः लाभार्थी आयुष्मान कार्ड काढू शकतात.
आयुष्मान कार्डचे लाभ : प्रति कुटुंब, प्रति वर्ष 5 लाख पर्यंतच्या आरोग्य सुविधा मोफत, 1209 आजारांचा उपचाराकरीता समावेश तसेच देशातील सर्व शासकीय अंगीकृत खाजगी रुग्णालयात लाभ घेता येतो.
अधिक माहितीकरीता आपल्या नजीकचे शासकीय रुग्णालय, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत तसेच अंगीकृत खाजगी रुग्णालयातील आरोग्य मित्राशी संपर्क साधावा. सर्व पात्र लाभार्थी व्यक्तींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपले आयुष्मान कार्ड त्वरित काढून घ्यावे. जेणेकरून, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा अत्यावश्यक वेळेस तात्काळ लाभ घेण्यास मदत होईल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment