शहीद पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही - सीईओ विवेक जॉन्सन
Ø पोलिस स्मृति दिनानिमित्त शहीद पोलिसांना श्रद्धांजली
चंद्रपूर, दि. 21 : नागरिकांचे तसेच देशाचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केले.
पोलीस स्मृतिदिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक विजय राठोड, राजेश मुळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, कर्तव्यावर असताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद पोलिसांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस शहीद दिन पाळला जातो. लडाखच्या बर्फाच्छादित प्रदेशात 21 ऑक्टोबर 1959 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान सीमेवर गस्त घालत असताना चिनी सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. या 10 पोलीस शहीद झाले. तेव्हापासून राज्यात आणि देशात वर्षभरात शहीद झालेल्या पोलिसांना 21 ऑक्टोबर रोजी अभिवादन करण्यात येते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पोलीस मुख्यालयात असलेल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच यावेळी पोलिसांनी बंदुकीच्या गोळ्या हवेत झाडत शहिदांना मानवंदना दिली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शहीद परिवारातील कुटुंबीयांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली.
00000
No comments:
Post a Comment