Search This Blog

Thursday, 5 October 2023

खालसा कॉन्व्हेंट हायस्कूल येथे विधी साक्षरता कायदेविषयक जनजागृती अभियान


खालसा कॉन्व्हेंट हायस्कूल येथे विधी साक्षरता कायदेविषयक जनजागृती अभियान

चंद्रपूर, दि. 05 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व खालसा कॉन्व्हेंट हायस्कूल, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने खालसा कॉन्व्हेंट हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी विधी साक्षरता व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम गुरुद्वारा गुरुसिंग सभेच्या खालसा कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, गुरुद्वारा गुरुसिंग सभेचे अध्यक्ष चमकौरसिंग बसरा, कोषाध्यक्ष सुरींदरसिंग गिल, लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक ॲड.विनोद बोरसे,ॲड. महेंद्र असरेट आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी म्हणाले, बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी समाजाने पुढे येणे आवश्यक आहे. केवळ आपल्या पाल्याला शाळेत पाठविले म्हणजे जबाबदारी संपली असे पालकांनी समजू नये. बालकांच्या हातून नकळत चुका तर होत नाही ना? बालकांचे इतरांकडून लैंगिक शोषण तर होत नाही ना? याबाबत देखील पालकांनी दक्ष राहावे. शिक्षकांनी सुद्धा बालकांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे, असे सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा अर्थात लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम 2012 मधील कायद्यातील विविध तरतुदी उदाहरणासह समजावून सांगितल्या.

जिल्हा महिला व बाल विकास विभागातर्फे बालहक्क जनजागृती :

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात बालहक्क आणि किशोर वयातील बदल या विषयावर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे 1098 या टोल-फ्री क्रमांकाची देखील जनजागृती करण्यात येत आहे. यानिमित्त लोकमान्य टिळक विद्यालय,चंद्रपूर येथे जिल्हा चाईल्ड हेल्पलाइन तथा बालकल्याण समितीद्वारे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बालकल्याण समिती सदस्या ज्योस्ना मोहितकर, अमृता वाघ आणि वनिता घुमे यांची प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रमाप्रसंगी बालकल्याण समितीतील सदस्यांनी बालकांशी संवाद साधला आणि बालहक्क आणि किशोर वयातील बदल या विषयावर महत्त्वाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बनाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाइल्डलाईन हेल्पलाइन समन्वयक अभिषेक मोहुर्ले यांनी सहकार्य केले.

००००००

No comments:

Post a Comment