Search This Blog

Friday, 27 October 2023

नव मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम - जिल्हाधिकारी विनय गौडा




 

नव मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूर, दि. 27 : निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदार हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नव मतदारांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी या मोहिमेदरम्यान आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी व आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देतांना ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अश्विनी मंजे उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 18 ते 19 वयोगटातील महाविद्यालयातील नव मतदार, दुर्गम भागातील भटक्या व विमुक्त जातीतील नागरीक, तृतीयपंथी नागरिक, देहविक्री करणा-या महिला, लैंगिक अत्याचाराने पिडीत महिला, अनाथालयातील 18 वर्षांवरील मुले / मुली, वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिक आदींचे मतदार यादीत नाव नोंदणी करण्याकरीता विशेष मोहीम राबविण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 19 ऑक्टोबर 2023 पासून महाविद्यालयात 18 ते 19 वयोगटातील तसेच ज्या विद्यार्थ्यांचे मतदार यादीत नाव नाही, अशा विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील 105 महाविद्यालयात   विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

विशेष शिबिरांचे आयोजन : नव मतदारांच्या नोंदणीकरीता जिल्ह्यात 4 आणि 5 नोव्हेंबर 2023 तसेच 25 आणि 26 नोव्हेंबर 2023 रोजी  जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेंतर्गत संबंधित मतदान क्षेत्रातील मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडे उपलब्ध मतदार यादीची तपासणी करून आपले नाव असल्याची खात्री करावी. मतदार यादीत नाव नसल्यास नमुना – 6, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह सादर करावे.

तसेच 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत महाविद्यालयातील 18 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांची 100 टक्के नोंदणी करण्याकरीता विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. दि. 18 आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी संपूर्ण जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी आणि दिव्यांग व्यक्तिंसाठी तर 2 आणि 3 डिसेंबर रोजी तृतीयपंथी नागरिक, देहविक्री व्यवसाय करणा-या महिला आणि भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तिंसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

असा आहे पुनरिक्षण कार्यक्रम : शुक्रवारदि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येईल. मंगळवारदि.26 डिसेंबर 2023 पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. सोमवारदि.1 जानेवारी 2024 रोजी मतदार यादी विहित मापदंडानुसार योग्य असल्याचे तपासून अंतिम प्रसिद्धीकरिता निवडणूक आयोगाची परवानगी घेणे तसेच शुक्रवार दि. 5 जानेवारी 2024 रोजी जिल्ह्याची सर्व मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाचा तपशील : निवडणूक आयोगाने दिलेल्या पुनरिक्षण पूर्व उपक्रमानुसार जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाची कार्यवाही करण्यात आली आहे. सहा विधानसभा मतदारसंघातील सुसूत्रीकरणापूर्वी मतदान केंद्राची संख्या 2023 होती. मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये बदल करण्यात आलेल्या मतदान केंद्राची संख्या  54 आहे. 137 मतदान केंद्राच्या नावामध्ये बदल करण्यात आला आहे तर विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्राची संख्या 2 आहे. प्रस्तावित नवीन मतदान केंद्राची संख्या 11 असून एकूण 211 मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. सुसूत्रीकरणानंतर होणारी मतदान केंद्राची संख्या ही 2032 झाली आहे.

जिल्ह्यातील मतदारांची संख्या : 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघानुसार एकूण 9 लक्ष 25 हजार 150 पुरुष मतदार8 लक्ष 77 हजार 609 स्त्री मतदार, तर 52 तृतीयपंथी असे एकूण 18 लक्ष 2 हजार 811 मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण 9979 दिव्यांग व्यक्तिंची नोंदणी असून यापैकी मतदार म्हणून 5227 दिव्यांगांची नोंदणी झाली आहे.

०००००००

No comments:

Post a Comment