Search This Blog

Monday, 9 October 2023

वन्यजीव सप्ताहानिमित्त वने व वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत जनजागृती

 वन्यजीव सप्ताहानिमित्त वने व वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत जनजागृती

चंद्रपूर, दि. 09: एफडीसीएम, चिचपल्ली येथील वनपरीक्षेत्र कार्यालयाच्या वतीने 1 ते 7 आक्टोबर 2023 या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्याने सदर सप्ताहात वने व वन्यजीवांचे संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. त्यासोबतच स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले.

वन्यजीव सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन इकोपार्क, मूल येथे करण्यात आले होते. याप्रसंगी चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) श्री. घोरुडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सांरग बोथे, संजीवन पर्यावरण संस्थेचे प्रतिनिधी उमेशसिंग झिरे यांच्यासह इतर पर्यावरण संवर्धन संस्थांचे प्रतिनिधी, वनविभाग व एफडीसीएम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चिचपल्ली येथे शाळेतील शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या सहाय्याने वन्यजीवाबंद्दल माहितीपट दाखविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख करुन देत त्यांचे महत्व पटवून देण्यात आले. त्यासोबतच गावातील लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने वनविभाग व एफडीसीएम च्या वतीने चिचपल्ली-अजयपुर-केळझर-जानाळा-मुल येथून मोटरसायकल रॅली काढण्यात आली.  सदर रॅलीदरम्यान वन्यजीवांची सुरक्षा करण्याचे आवाहन करण्यात आले असून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याकरीता उपाययोजना सांगण्यात आल्या.

नागरिकांनी वन्यजीव, पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी हातभार लावावा आणि मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला वनपरीक्षेत्र अधिकारी सांरग बोथे यांच्या मार्गदर्शनात श्री. कुमरे, श्री. चव्हाण, श्री. शिंदे, श्री. गवई, श्री. गव्हारे, श्री. सिंघन यांनी सहकार्य केले.

00000

No comments:

Post a Comment