लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा - निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार
चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून 28 एप्रिल 2015 पासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना सुलभ व काल मर्यादित ऑनलाइन सेवा उपलब्ध करून द्याव्या, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी अपील मॉडेल प्रशिक्षणादरम्यान दिल्या.
नियोजन भवन आज (दि.18) रोजी आयोजित जिल्ह्यातील सर्व विभागातील प्रथम व द्वितीय अपील अधिका-यांना तसेच प्रत्येक विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, अधिसूचित सेवाचे प्रथम व द्वितीय अपील अधिकारी उपस्थित होते.
लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत नागरिकांची कामे जलद गतीने करण्यात यावी. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यालयात दर्शनी भागात सेवा अधिनियम बाबत तसेच देण्यात येणाऱ्या अधिसूचित सेवाबाबतचा फलक लावावा. शासनाने आपले सरकार पोर्टलवर 37 विभागांच्या 511 सेवा अधिसूचित केलेल्या असून त्यांचा नागरिक ऑनलाईन लाभ घेऊ शकतात. अधिसूचित सेवा नागरिकांना वेळेवर दिल्या जात आहेत किंवा नाही यासंदर्भात सुधारणा होण्यासाठी लोकसेवा आयोग गठीत करण्यात आलेला आहे. नागरिकांना विहित काल मर्यादित सेवा न मिळाल्यास, नामंजूर झाल्यास आता ते सेवांकरिता आपले सरकार सेवा केंद्र व आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाइन अपील करू शकतात. ह्या अपिलांवर प्रथम व द्वितीय अपील अधिकारी कार्यवाही करतील व कार्यवाहीत समाधान न झाल्यास अर्जदारास तृतीय व अंतिम अपील राज्यसेवा हक्क आयुक्त, नागपूर विभाग यांच्याकडे करता येईल. तसेच लोकसेवा हक्क अधिनियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पवार यांनी दिली
यावेळी जिल्हा समन्वयक महा आय.टी. चे जिल्हा समन्वयक विकास लालसरे यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना आपले सरकार अपील मॉड्यूल बीटा वर्जनबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले.
००००००
No comments:
Post a Comment