स्पर्धेतूनच यशस्वी व्यक्ती घडत असतो -मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुळकर्णी
चंद्रपूर दि. 12: स्पर्धेतूनच यशस्वी व्यक्ती घडत असतो. म्हणून स्पर्धेला न घाबरता विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा यातून विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण बाहेर पडतील, असे प्रतिपादन मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुळकर्णी यांनी केले. जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सुमित जोशी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी प्रदीप काठोळे तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील शासकीय तथा निमशासकीय बालगृहातील मुलांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा तसेच इतर मुलांसोबत स्पर्धा करण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी चाचा नेहरू बालमहोत्सव सुरू करण्याची परंपरा प्रेरणादायी आहे.
बक्षीस वितरण : पोलिस फुटबॉल मैदान येथे रंगलेल्या तीन दिवसीय कबड्डी, खो-खो, गोळा फेक, धावणे, रिले, कॅरम, बुद्धिबळ, निबंध, वक्तृत्व, वादविवाद, नृत्य, गायन आदी जिल्हास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विजेते स्पर्धक नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील चाचा नेहरू बाल महोत्सव 2023-24 स्पर्धेकरीता पात्र ठरले आहेत.
उल्लेखनीय कार्याबाबत गौरव : या सोहळ्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षातील, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय साखरकर, समुपदेशक प्रिया पिंपळशेंडे, समाजसेविका प्रतिभा मडावी यांना उल्लेखनिय कार्याबाबत मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुळकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
000000
No comments:
Post a Comment